पुणे :- शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर होत असून याकडे महापालिका प्रशासन वेळोवेळी दुर्लक्ष केले जात आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यावरून पतित पावन संघटनेने महापालिकेमध्ये महापौर दालनाबाहेर घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी आयुक्त तसेच आरोग्य विभागविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
कुत्र्याचा बंदोबस्त करण्यावरून आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह
शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक हैराण झाले असून लहान मुले व वयस्कर व्यक्तींवर अशा कुत्र्यांनी हल्ला करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. कुत्रे चावण्याच्या या मोठ्या प्रमाणाकडे पाहता भविष्यात या रोगाचे रुग्ण दिसू शकतील, अशी भीतीही व्यक्त होते. भटक्या कुत्र्यावर नसबंदी शस्त्रक्रिया करूनही त्यांच्या संख्येवर निर्बंध येत नसल्याने कुत्र्याचा बंदोबस्त करण्यावरून पालिकेच्या आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तरी पालिका प्रशासनाने लवकरात लवकर ठोस उपाययोजना करुन त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पतित पावन संघटनेने यावेळी केली.
तीव्र आंदोलनाचा इशारा
याबाबतचे निवेदन महापौर मुक्ता टिळक यांना देण्यात आले. त्यावर आठवडाभरात ठोस उपाययोजना करून या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जाईल, असे आश्वासन महापौरांनी दिले. यावर आठवडाभरात शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त झाला नाही तर आयुक्तांच्या कार्यालयात 25 भटकी कुत्री सोडून यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा संघटनेच्या वतीने यावेळी देण्यात आला.