चौकशी करण्याची आयुक्तांकडे केली मागणी
पिंपरी चिंचवड : शहरात मोकाट व भटक्या कुत्र्यांवर संतती नियमन शस्त्रक्रिया करण्यासाठी गेल्या चार वर्षात 4 कोटी 3 लाख 36 हजार रुपयांचा खर्च करण्यात आला. या खर्चात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे. याबाबत आयुक्त श्रावण हार्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. शहरात मोकाट व भटक्या कुत्र्यांचा त्याचबरोबर डुकरांचा उपद्रव वाढला आहे. त्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. महिला, बालक व रात्रीच्या वेळी पादचार्यांवर कुत्र्यांकडून हल्ले होतात. अशा घटनांमध्ये नागरिक जखमी होत आहे. याबाबत अनेक तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत.
14 हजार 160 कुत्र्यांवर शस्त्रक्रिया…
हे देखील वाचा
महापालिकेच्या वतीने शहरातील मोकाट व भटकी कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी दोन खासगी एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. कुत्री पकडून नेहरुनगर येथील गुलाबपुष्प उद्यानाशेजारच्या डॉग शेल्टरमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाते. एका कुत्र्यासाठी 693 रुपये खर्च येतो. सन 2015 ते 16 मध्ये एकूण 15 हजार 808 कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली गेली. त्यासाठी एकूण 1 कोटी 9 लाख 55 हजार 523 रुपये खर्च झाला. सन 2016-17 या वर्षात 14 हजार 907 मोकाट कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली गेली. त्याकरिता पालिकेने 1 कोटी 3 लाख 30 हजार 916 रुपये खर्च केले. 2018-19 मध्ये आजअखेर 15 हजार 160 मोकाट कुत्री पकडली. त्यापैकी 14 हजार 160 कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली गेली. एकूण 253 जखमी, आजारी व पूर्वी शस्त्रक्रिया झालेल्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया न करता सोडून देण्यात आले.
दोषींवर कारवाई करा…
गेल्या 4 वर्षांत आतापर्यंत एकूण 58 हजार 203 कुत्र्यांवर तब्बल 4 कोटी 3 लाख 305 हजार रुपये इतका खर्च झाला आहे. खर्च करुनही शहरात मोकाट व भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण देण्याऐवजी त्यांची संख्या आहे, तशीच किंवा वाढलेली दिसते. त्यामुळे या कामावर झालेला 4 कोटी 3 लाख 305 हजार रुपये ही रक्कम प्रत्यक्षात खर्च झाली की, कागदोपत्री रंगविण्यात आले, याची चौकशी करुन यामध्ये काही गैरप्रकार असेल तर संबंधित दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी भापकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.