भडगाव शहरात‘राष्ट्रीय एड्स नियंत्रण जागृती’ कार्यक्रम

0

भडगाव । येथील रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रेड रिबन क्लब अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग तसेच जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय एड्स नियंत्रण जनजागृती’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ’एड्स रोगाची कारणो व त्यावरील उपाय’ या विषयावर बोलताना डॉ.राहुल पाटील म्हणाले की, “एड्सविषयी असलेली अपुरी किंवा चुकीची माहिती यामुळे हा रोग झपाट्याने पसरला आहे. रक्ताची देवाणघेवाण करतांना व इंजेक्शन देताना योग्य ती काळजी न घेतली गेल्यामुळे हा रोग मोठया प्रमाणावर पसरत गेला आहे. तसेच असुरक्षित लैंगिक संबंध हेसुद्धा या रोगाच्या प्रसारामागचे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे हा रोग होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे. एड्सबाधित रूग्ण योग्य औषधोपचारांच्या मदतीने बराच काळ सामान्य जीवन जगू शकतात.” प्रा. दीपक मराठे यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.

‘एड्सविषयी सामाजिक गैरसमजुती’ दिल माहिती
‘एड्सविषयी सामाजिक गैरसमजुती’ या विषयावर बोलताना ते म्हणाले की,“एड्स ही फार मोठी सामाजिक समस्या आहे. स्पर्शाने किंवा रुग्णाच्या सहवासाने हा रोग होत नाही. त्यामुळे त्यांना दूर न लोटता एड्सबाधित रूग्णांकडे समाजाने सहानुभूतीने पाहिले पाहिजे. ज्यामुळे त्या रुग्णांना या रोगाला तोंड देताना उमेद निर्माण होईल. एड्स जनजागृती करण्यासाठी तरूणांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.” प्रा.ए.एन. भंगाळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. एस. आर. पाटील होते. विद्यार्थ्यांमध्ये एड्सबद्दल जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने विद्यार्थी कल्याण विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एम. डी. बिर्ला यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. एस.एम. झाल्टे यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी व प्राध्यापक मोठया प्रमाणावर उपस्थित होते. विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. पी.डी.पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.