भरदिवसा चाकूचा धाक दाखवून म्हसावदमधून विद्यार्थ्याचे अपहरण !

0

पुण्याहून तिघांच्या तावडीतून सुटून मुलगा पोहचला बालेवाडीतील नातेवाईकांकडे ; नातेवाईक मामाने म्हसावद आणून सोडले

जळगाव- घरुन शिकवणीसाठी गेलेल्या नववीचा विद्यार्थी उदय ज्ञानेश्‍वर भोई वय 15 रा. म्हसावद याचे चाकूचा धाक दाखवित तीन अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी समोर आला आहे. म्हसावद येथून त्याला जळगावात आणून येथून चारचाकीने त्याला पुण्यात नेण्यात आले. याठिकाणाहून तीघांच्या तावडीतून सुटका करुन विद्यार्थी त्याच्या बालेवाडीतील नातेवाईकांमार्फत त्याच्या मूळ गावी पोहचला आहे. उदयसह त्याचे कुटुंबिय गुरुवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्रकाराबाबत तक्रार देणार असून यानंतर नेमके प्रकार काय हे समोर येणार आहे.

शिकवणीसाठी घरुन गेला, मात्र परतलाच नाही
म्हसावद येथे इंदिरानगरात उदय हा वडील ज्ञानेश्‍वर भिका भोई, आई मंगला, दोन बहिणी प्रतिभा, अर्चना व लहान भाऊ हितेश या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. तो गावातील शाळेतील नववी इयत्ते शिक्षण घेतो. उदय याने गावात शिकवणी लावली आहे. त्यासाठी नियमितप्रमाणे 8.30 वाजता तो शिकवणी साठी गेला. सकाळपासून गेलेला उदय सायंकाळी 7.30 वाजूनही तो घरी परतला नाही. कुटुंबियांनी शिकवणी असलेल्या शिक्षकाचे घर गाठले. याठिकाणी त्याचे दप्तर मिळून आले. उदय मिळून आल्याने कुटुंबियांची चिंता वाढली. त्याच्या कुटुंबियांसह गावातील नागरिकांनी, तरुणांनी रात्रभर त्याचा पसिरातील विटनेर, जळके, वावडदा या गावांमध्ये शोध घेतला, मात्र तो मिळून आला नाही. यांनतर म्हसावद दूरक्षेत्र पोलीस ठाण्यातही कुटुंबिय तक्रारीसाठी गेले मात्र त्यांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रारीचा सल्ला तेथील कर्मचार्‍यांनी दिला.

जळगाव घेवून जावून कारमधून नेले पुण्याला
अपहरण झालेल्या उदयने दिलेल्या माहितीनुसार, तो सोमवारी शिकवणीला गेला. याठिकाणी लघवी करण्यासाठी तो शिकवणी असलेल्या घरापासून काही अंतरावर गेला. याठिकाणी आधीच तीन अज्ञात व्यक्ती लपून होते. त्यांनी उदयला चाकूचा धाक दाखवून तु हमारे साथ चल, असे म्हणत एकाने पाचशे रुपये दिले. हमे जळगाव जाना असे सांगितले. यानंतर दुचाकीवरुन जळगावातील रायसोनी महाविद्यालयाजवळ आणले. याठिकाणी एक कार उभी होती, त्या कारसोबतच्या इसमाला दुचाकी दिली, तिघांनी उदयला कारमध्ये बसविले. यानंतर कार निघाली. रस्त्यातच आणखी दोन मुलांना गाडी बसविले. ते दोघेही हसतखेळत असल्याने त्याच्या सोबतचे असावेत, असे उदयचे म्हणणले आहे. अशा प्रकार उदयसह सातही जण कारने मध्यरात्री 2 वाजता पुण्याला पोहचले.

उदय तावडीतून पळाला अन् पायी बालेवाडीत पोहचला
उदयने दिलेल्या माहितीनुसार, पहाटे 2 वाजता गाडी ज्या थांबली, त्याठिकाणी एका वॉशिंगसेंटर होते. याठिकाणी अनेक कार लावल्या होत्या. या ठिकाणी उतरताच अपहरण करणार्‍या तिघांनी कार वॉशिंग करण्यास सांगितले. प्रवासात कारमध्ये बसलेले दोघेही कार धुवायला लागले. भिती वाटायला लागल्याने उदय तिघांचे लक्ष चुकवून पळ काढला. रात्रीच्या सुमारास रस्त्यावरुन पळतांना कुत्रेही भुंकत होते, एका व्यक्तील ा कोणते गाव आहे हे विचारले असता, पुणे असल्याचे उदयला समजले. यानंतर त्याने नागरिक, दुकानदारांना विचारत विचारत, पायी बालेवाडी गाठले. सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास तो पोहचला. याठिकाणी त्याचे मामा शंकर भोई वास्तव्यास आहे. त्यांचा कॅटरींगचा व्यवसाय असल्याने त्याचा अनेक दुकानदार ओळखतात, अशा पध्दतीने उदय याने त्याच्या पत्त्याची माहिती एका दुकानदाराकडून मिळवली. त्यानुसार त्यांच्या घरी पोहचला. मामा शंकर यांना त्याने आपबिती सांगितली. व म्हसावद येथे कुटुंबियांनाही प्रकार कळवून सुखरुप असल्याने सांगितले. त्याचा फोन आल्यानंतर कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला.

मामाने उदयला सोबत घेत गाठले जळगाव
शंकर भोई यांनी उदयला सोबत घेवून महाराष्ट्र एक्स्प्रेसने भुसावळ गाठले. साकेगाव येथील भाऊ विजय भोई यांचे घर गाठले. तेथून दोघे मामांसह उदय बुधवारी रात्री 7 वाजेच्या सुमारास म्हसावद पोहचला. तीन दिवसांपासून बेपत्ता पोटच्या गोळ्याला बघताच आई मंगला यांना अश्रू अनावर झाले. उदयचे काका कैलास भिका भोई हे जिल्हा परिषदेत छापखाना विभागात कंत्राटी तत्वावर शिपाई म्हणून नोकरीला आहेत. त्यांना प्रकाराबाबत विचारला असता, त्यांनी उदयने सांगितलेल्या माहितीला दुजोरा दिला आहे. उदयप्रमाणे इतर मुलांचे होवू नये म्हणून ही सामाजिक बांधिलकी ठेवत, गुरुवारी सकाळी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून याप्रकाराची तक्रार देणार असल्याचे, कैलास भोई यांनी बोलतांना सांगितले.