पुण्याजवळील चाकण येथे अपघात ; कुटुंबातील सदस्यही झाले जखमी
भुसावळ- पर्यटनासाठी गेलेल्या भुसावळातील मूळ रहिवासी व हल्ली जळगावस्थित कुटुंबाच्या चारचाकीला पुण्याजवळील चाकण येथे समोरून येणार्या आयशर ट्रकने धडक दिल्याने जळगावातील सुप्रीम कंपनीतील कर्मचारी असलेल्या सागर वसंत बडगुजर (34) या कर्मचार्याचा जागीच मृत्यू झाला तर कुटुंबातील पत्नी, मुलांसह अन्य नातेवाईक जखमी झाले. मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. सागरच्या मृत्यूने भुसावळसह जळगावातील दत्त नगरात शोककळा पसरली.
पहाटे झाला अपघात, एक जागीच ठार
सागर वसंत बडगुजर (34, मूळ रा.भुसावळ, हल्ली मुक्काम कानळदा रोड, दत्त नगरसमोर, राधारमण अपार्टमेंट, जळगाव) हे पत्नी, मुलांसह पुण्यात पर्यटनासाठी गेले होते. मंगळवारी पहाटे या कुटुंबासह बडगुजर यांचे साडू व अन्य नातेवाईक परतीच्या प्रवासात असताना समोरून येणार्या आयशर वाहनाने चारचाकीला धडक दिल्याने बडगुजर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर कुटुंबातील अन्य सदस्य जखमी झाले. अपघाताचे वृत्त कळताच भुसावळ व जळगावातील नातेवाईकांनी चाकण येथे धाव घेतली. मयत सागर हे भुसावळच्या नाहाटा महाविद्यालयाचे सेवानिवृत्त क्लार्क वसंत बडगुजर यांचे लहान चिरंजीव आहेत. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील असा परीवार आहे. मंगळवारी रात्री उशिरा मृतदेहावर जळगाव येथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.