जळगाव : नेरी ते जळगाव शहर व शहरातून अजिंठा चौफुली ते रेल्वे स्टेशनदरम्यान भरधाव कंटेनर चालकाने अनेक वाहने उडवल्याचा थरारक प्रकार रविवारी दुपारी घडली. भरधाव कंटेरने नेरी ते जळगावदरम्यान ५० हुन अधिक वाहने उडवल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे या घटनेत एकजण ठार झाल्याची माहिती असून भाऊसाहेब रावसाहेब खांडवे वय ३९ रा. कर्हे वडगाव ता. आष्टी जि. बीड यास शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मलकापूरमध्ये कंटेनर (एमएच २३ ए यु) हा केमिकल खाली करून मुंबईकडे जात होता. या दरम्यान कंटेनरने नीरेजवळ काही वाहनांना उडवले .संबंधित वाहनचालक मागावर असल्याने भीतीने कंटेनर चालकाने कंटेनर भरधाव वेगाने पळवला. मद्याच्या नशेत असलेल्या खांडवे या चालकाने रस्त्यात आहे हयगय करता समोर येणारी अनेक वाहने उडविली. यात एक दुचाकीस्वार ठार झाला असल्याची माहिती मिळाली आहे. अजिंठा चौफुली चित्रा चौक टॉवर चौक मार्गे हा कंटेनर रेल्वे स्टेशनच्या समोर थांबला. त्याच्या मागावर असलेल्या नागरिकांनी त्याला चोप दिला. प्रकाराची माहिती मिळाल्यावर टॉवर चौकात बंदोबस्तावर असलेले शहर पोलिस ठाण्याचे गणेश शिरसाळे, अक्रम शेख रतन गिते, सुधीर साळवे, संजय झाल्टे यांनी कंटेनर चालक भाऊसाहेब खांडवे यास ताब्यात घेत शहर पोलिस ठाण्यात आणले. पुढील कार्यवाही पोलीस करीत आहेत.