भरधाव कार अ‍ॅपेवर आदळून एक ठार ; पाच सहा जखमी

0

विवरे-रावेर रस्त्यावर अपघात ; मुलीच्या जावळासाठी जाणार्‍या पित्यावर काळाचा घाला

रावेर- तालुक्यातील वाघोड येथे मुलीच्या जावळासाठी अ‍ॅपे रीक्षाने जाणार्‍या भांडूपच्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याने पित्याचा अपघाती मृत्यू झाला तर अ‍ॅपे चालकासह अन्य सहा जण जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी साडेबारा वाजता विवरे-रावेर रस्त्यावरील पंजाबशहाबाबा दर्ग्याजवळ घडली. भरधाव कार व अ‍ॅपे रीक्षात समोरा-समोर धडक झाल्याने अपघात झाला. किरण वसंत धनोळे (40) असे मृत इसमाचे नाव आहे.

मुलीच्या जावळासाठी जाणार्‍या पित्यावर काळाचा घाला
भांडुप येथील नवजीवन पॉलीटेक्नीक कॉलेजचे लॅब असिस्टंट किरण वसंत धनोळे (40) हे पत्नी रेवती धनोळे (वय 35) व चार वर्षांची मुलगी लावण्यासह वाघोडला येत होते. गुरुवारी लावण्याच्या जावळाचा कार्यक्रम असल्याने हे कुटुंबीय भुसावळातून अ‍ॅपे (क्रमांक एम.एच.19 ए.एफ.8978) ने वाघोडकडे जात असताना पंजाबशहा बाबांच्या दर्ग्याजवळ रीक्षा व कार (क्रमांक एम.एच.19 सी.एफ.5501) ची समोरा-समोर धडक झाली. अपघातात अ‍ॅपे रीक्षा चालकासह एकूण सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये धनोळे कुटुंबियांचाही समावेश आहे. किरण धनोळे यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी रेवती धनोळे यांच्यावर रावेरात प्राथमिक उपचार करुन फैजपूरला हलवण्यात आले. धनोळे दांपत्याची मुलगी लावण्याला किरकोळ दुखापत झाली आहे. जखमी अ‍ॅप रीक्षा चालक आणि अन्य दोन जखमी प्रवाशांची नावे कळू शकली नाहीत. रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर धनोळे यांच्यावर वाघोड येथे अंत्यसंस्कार झाले. या अपघातामुळे धनोळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. मृत धनोळे वाघोड येथील सेवानिवृत्त शिक्षक वसंत धनोळे यांचे सुपूत्र होत. याप्रकरणी प्रदीप धनोळे यांच्या फिर्यादीवरुन कार चालकाविरुद्ध रावेर पोलिस ठाण्यात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.