भरधाव चारचाकीने उडवल्याने पिता-पूत्राचा करुण अंत

0

बोहर्डी फाट्यावरील घटना ; साडू गंभीर जखमी

भुसावळ- भरधाव चारचाकीने उडवल्याने चार वर्षीय बालकासह पित्याचा करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील बोहर्डी फाट्याजवळ बुधवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीस्वार साडूदेखील गंभीर जखमी झाला आहे. चेतन रवींद्र जैतकर (04) व रवींद्र नारायण जैतकर (40) अशी मयतांची नावे आहेत.

ओव्हरटेकच्या प्रयत्नात चारचाकीची दुचाकीला धडक
ऐनपूरचे रहिवासी असलेले रवींद्र जैतकर, त्यांचा चार वर्षीय मुलगा चेतन व त्यांचे साडू प्रभाकर कोळी हे बुधवारी दुपारी मुक्ताईनगरहून भुसावळकडे दुचाकी (एम.एच.19 डी.एफ.3687) ने येत असताना ओव्हरटेकच्या प्रयत्नात पाठीमागून आलेल्या मारोती झेन (एम.एच.31 सी.एन.9977) ने जोरदार धडक दिल्याने चिमुकल्या चेतनचा जागीच मृत्यू झाला तर दोघे साडू गंभीर जखमी झाल्याने त्यांना गोदावरी रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरू असताना सायंकाळी रवींद्र यांचा मृत्यू झाला तर त्यांचा साडू प्रभाकर कोळी यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी वरणगाव पोलिसात विजय नारायण जैतकर (33, ऐनपूर, ता.रावेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून झेन चालका रामचंद्र चिंतामण सोनवणे (33, दीपनगर) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. तपास सहाय्यक निरीक्षक सारीका कोडापे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मनोहर पाटील करीत आहेत.