भरधाव टँकरच्या धडकेत मातेसह तीन मुले जागीच ठार

0

भुसावळ । प्रतिनिधी । मुंबई-नागपूर महामार्गावरून पायी चालणार्‍या फासेपारधी कुटुंबाला भरधाव टँकरने चिरडल्याने मातेसह तीन मुलांचा जागीच करुण अंत झाला. हा अपघात रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घोडसगाव ते चिखली गावादरम्यान हॉटेल गजाननजवळ घडली. मृतांमध्ये १३ महिन्यांच्या बालकाचा समावेश आहे. काळाने झडप घातलेले हे कुटुंब मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथील आहे. या अपघातात दोन जण बचावले असून १२ वर्षीय मुलगा मात्र जखमी झाला आहे.

कुटुंबावर काळाचा घाला
रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घोडसगाव येथून आपल्या बिढारासह चिखली गावाकडे रूद्राक्ष व मणी माळ विक्रीसाठी गोधन पवारांसह त्यांच्या कुटुंबातील एकूण सात सदस्य चिखली गावाकडे जात क्रुर काळाने घाला घातला. गोधन व त्यांचा मुलगा सायकलीवर तर अन्य पाच जण पायी जात असतानाच मुक्ताईनगरकडून मलकापूरकडे जाणारा भरधाव टँकर (क्र.एम.एच.०६-एक्यू.९९९७) ने चौघांना चिरडले. या अपघातात अमरसिंग गोधन पवार (१३ महिने), निम्मीबाई गोधन पवार (३८), अल्कोस पवार (८), उडडीया गोधन पवार (६) हे जागीच ठार झाले. अपघाताचे चित्र एव्हढे भीषण होते की रक्तमांसाचा सडा पडल्याने पाहणार्‍यांना अश्रू आवरणे कठीण झाले होते. टँकरचा फटका बसल्याने निहाल गोधन पवार (१) हा गंभीर जखमी झाला तर अपघातातून गोधन व नेहा बाई हे दोघे बचावले आहेत. अपघातानंतर टँकर चालक पसार झाला आहे.