भरधाव ट्रालाने दुचाकीस्वारास चिरडले

0

शिवकॉलनी उड्डाणपुलाजवळील घटना; ट्राला ताब्यात

जळगाव । शिवकॉलनीतील रेल्वे उड्डाण पुलाजवळ दुचाकीला रिक्षाने कट मारल्याने दुचाकीस्वार रोडच्या मधोमध पडून धुळ्याकडून सावदाकडे जाणार्‍या भरधाव ट्रकच्या पुढच्या चाकाखाली 28 वर्षीय तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडली असून जिल्हा पेठ पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती अशी की, मयुर सुनिल दिवेकर (वय-28) रा. शनिपेठ हा सकाळी काही कामानिमित्त सकाळी 11 वाजता घरात काहीही न सांगता सुझुकी अ‍ॅक्सेस क्र. (एमएच 19 बीएल 8884) ने बाहेर गेला होता. सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास बांभोरीकडून घरी येत असतांना शिवकॉलनी जवळील उड्डाणपुलाजवळ मागे येत असलेल्या अज्ञात रिक्षा चालकाने कट मारल्याने दुचाकीवर बसलेला मुयर दिवेकर हा रस्त्याच्या मध्यभागी पडला. याचवेळी धुळ्याकडून सावदाकडे भरधाव वेगाने जाणार्‍या ट्राला क्र.(आरजे 11 जीए 5840) च्या पुढच्या चाकात येवून चिरडल्याने मयूरचा जागीच मृत्यू झाला. या घटना घडताच गुजराल पेट्रोल पंपावर गस्त असलेले वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ जखमी अवस्थेत जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले मात्र वैद्यकिय अधिकारी यांनी मृत घोषीत केले.

रिटा अ‍ॅटो गॅरेजवर होता कामाला
मयत मयूर दिवेकर याला दहा वर्षांपुर्वी वारल्याने घरातील कमवता व कर्ता मुलगा होता. रिटा अ‍ॅटो गॅरेजवर दुचाकी दुरूस्तीचे कामे करत होता. अल्पावधील मयूरने मेकॅनिक म्हणून नाव कमविले असल्याने नातेवाईकांडून बोलले जात होते. घरात आई शिलादेवी दिवेकर, पंकज दिवेकर आणि सुमित दिवेकर हे दोन भाऊ आणि सोनू , आरती आणि निशा या तिन बहिणी आहेत. यातील मोठी बहिण सोनूचे लग्न झाले असून दोन भाऊ व दोन बहिणी अविवाहित आहे.

ट्रालासह चालक पोलिसांच्या ताब्यात
अपघात होताच गुजराल पेट्रोल पंपाच्या चौकात ड्यूटीवर असलेले वाहतूक पोलिस कर्मचारी भास्कर चौधरी यांच्यासह इतर कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर सुरूवातीला ट्रला चालक करणसिंग विक्रमसिंग (वय-26) रा. 26 मोसीगढी जडीगढी ता.खुअडाला जि.फिरोजाबाद (राजस्थान) याला ट्रालासह जिल्हा पेठ पोलिसात ताब्यात घेतले आहे. या घटनेबाबत ट्रक चालकाविरोधात जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आईचा आक्रोश
ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी मयत मयुरची ओळख पटलेली नव्हती. मात्र सुझुकी अ‍ॅक्सेस शोरूमच्या सहाय्याने गाडी क्रमांक खरेदी केल्याची माहितीवरून शोरूमवरून ओळख पटली. त्यानुसार लहान भाऊ पंकल दिवेकर याच्याशी संपर्क साधुन त्याला अपघात झाल्याची माहिती दिल्यानंतर आईसह जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. जिल्हा रूग्णालयात मयूर मयत झाल्याची कळल्यानंतर आईने हंबरडा फोडला. घरातील कर्ता मुलगा गेल्याचे दुःखाचा डोंगर दिवेकर कुटुंबियांवर कोसळला. या घटनेबाबत परीसरात एकच हळहळ व्यक्त होत होती.