अकलूदजवळ अपघात ; अन्य दोघे मजूर जखमी ; तासभर वाहतूक ठप्प
भुसावळ- फैजपूरकडून भुसावळकडे लोखंडी बीम घेवून येणारे ट्रॅक्टर अकलूद गावाजवळ उलटल्याने ट्रॉलीखाली दबले जावून भुसावळ तालुक्यातील शिंदीच्या मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. दीपक भागवत बावस्कर (30, शिंदी, ता.भुसावळ) असे मयत मजुराचे नाव आहे तर या अपघातात अन्य दोघे मजूरही जखमी झाल्याचे सांगण्यात आले. अपघातानंतर ट्रॉली रस्त्यात आडवी झाल्याने तासभर वाहतूक ठप्प झाली होती.
अचानक उलटले ट्रॅक्टर
सूत्रांच्या माहितीनुसार फैजपूरकडून भुसावळकडे लोखंडी बीम घेवून जाणारे ट्रॅक्टर (एम.एच.19 ई.2654) हे अकलूद गावाजवळ शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास उलटले. या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर चार मजूरदेखील असल्याने ट्रॉलीखाली तेदेखील दबले गेले तर दीपक बावस्कर या मजूराचा ट्रॉलीखाली दबल्याने जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे मजूरही जखमी झाले. अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने पळ काढला. हा अपघात घडल्यानंतर पाठीमागून येणार्या बसमधील 20 ते 25 प्रवाशांनी हिंमत दाखवून उलटलेल्या ट्रॉलीखाली दबलेल्या बावस्कर यांना बाहेर काढले तसेच काही स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोरखंड लावून उलटलेली ट्रॉली सरळ केल्यानंतर सुमारे तासाभराने वाहतूक सुरळीत झाली. अपघाताची माहिती कळताच फैजपूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, हवालदार सुधाकर पाटील, रमण सुरळकर, महेंद्र महाजन यांनी धाव घेतली. दरम्यान, सायंकाळी उशिरा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आला.