खोटेनगर बसस्टॉपजवळील घटना ; जखमींना जागेवरच 500 रुपयांची आर्थिक मदत
जळगाव- शहरातील महामार्ग क्रमांक 6 वर भरधाव डंपरने बसला धडक दिल्याने अपघातात चार जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडली. जखमीमध्ये दोन महिलांसह एक चिमुकलीचा समावेश आहे. दरम्यान अपघातानंतर परिवहन मंडळाच्या योजनेनुसार जखमींना वाहकातर्फे तत्काळ 500 रुपयांची मदत करण्यात आली.
बस ( क्रमांक एम.एच.14 बी.टी.3280) जळगावकडून पेठकडे जात होती. खोटेनगर बसस्टॉपजवळ समोरुन भरधाव येणार्या डंपरने बसला जोरदार धडक दिली. यात बसच्या समोरच्या बाजूचे काचा फुटल्या तसेच समोरचा पत्रा दाबला जावून मोठे नुकसान झाले. तसेच बसमधील चार जण जखमी झाले आहे. जखमींमध्ये नुतनबाई पवार वय 25, संध्या राजपूत व अनन्या राजपूत यांचा समावेश आहे. जखमींना तत्काळ घटनास्थळी वाहक मुकूंद अहिरे यांनी तत्काळ 500 रुपयांची आर्थिक मदत केली आहे. अपघातानंतर डंपर पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र पसार होण्यात यशस्वी ठरला. दरम्यान घटनास्थळी बघ्याची एकच गर्दी झाली.