भरधाव डंपरने उडवल्याने 14 महिन्यांच्या बालकाचा मृत्यू

जामनेर पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरोधात गुन्हा : मयत मध्यप्रदेशातील रहिवासी

जामनेर : भरधाव डंपरने जोरदार धडक दिल्याने 14 महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला. जामनेर तालुक्यातील हिवरखेड रस्त्यावर बुधवारी दुपारी साडेतीन वाजता हा अपघात घडला. या प्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. शिवकास आकाश दावत (14 महिने, रा.पाटल्या, ता.झिरण्या, जि.खरगोन मध्यप्रदेश, ह.मु. स्टोन क्रेशर मशीन, गोंडखेड शेत शिवार, जामनेर) असे मयत बालकाचे नाव आहे.

डंपर चालकाविरोधात गुन्हा
शिवकास दावत हा अल्पवयीन मुलगा आपल्या कुटुंबियांसह गोंडखेव शिवारात जीवन जहागीरदार यांच्याकडील साईटवर वास्तव्याला होता. बुधवार, 6 जुलै रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास हिवरखेडा रोडवरील रस्त्यावर खेळत असतांना समोरून भरधाव वेगाने येणारा डंपर (एम.एच.19 झेड 2912) ने मुलाला जोरदार धडक दिल्याने शिवकास दावतचा मृत्यू झाला. याबाबत डंपर चालक नारायण नथ्थू चौधरी (रा.गोंडखेल, ता. जामनेर) याच्या विरोधात गुमानी कालू दावत (19, पाटल्या, ता.झिरण्या) यांच्या फिर्यादीनुसार जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार रवींद्र बिर्‍हाडे करीत आहे.