जळगाव । खान्देश सेंट्रल व गोविंदा रिक्षा स्टॉप परिसरात गेल्या आठवड्यात उघड्यावर जन्मलेल्या बाळाचा 29 रोजी जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात 22 मे रोजी खान्देश सेंट्रल व गोविंदा रिक्षा स्टॉप परिसरात फिरत असलेली अनिता मंगेश बारेला (वय 30, रा.बडवानी, मध्य प्रदेश) ही महिला भर रस्त्यावर प्रसूत होऊन महिलेने गोंडस अशा पुरुष जातीच्या बाळाला जन्म दिला होता. अनिता बारेला ही वेडसर महिला गेल्या काही दिवसांपासून रेल्वे स्टेशन परिसरातील धर्मशाळेत वास्तव्य करीत होती.
आठवडाभर सुरु होते उपचार
नेहमी प्रमाणे 22 रोजी अनिता खान्देश सेंट्रल परिसरात फिरायला गेली. गोविंदा रिक्षा स्टॉपपासून खान्देश सेंट्रलकडे जाणार्या रस्त्यावर तिला अचानक प्रसवकळा सुरु झाल्या, त्यामुळे ती जागेवरच बसली. तेथे काही क्षणातच तिने गोंडस बाळाला जन्म दिला होता. त्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. आठवडाभरापासून तिच्यावर व बाळावर उपचार सुरू होते. मात्र 29 रोजी बालक दगावले. प्रसुतीनंतर तब्बल अर्धा तास नवजात शिशु कडक उन्हात होते. तसेच उघड्यावर प्रसूती होऊन वातावरणाचा बाळाच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.