भर उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचे नियोजन कोलमडले

0

जळगाव । जळगाव शहरात साधारणतः पाच ते साडेपाच लाख लोकसंख्या असून जळगाव शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या वाघूर धरणात पुरेसा पाणी साठा असून सुद्धा जळगाव शहर महानगर पालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे जळगाव शहरातील साडेपाच लाख नागरिकांना भर उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचे नियोजन कोलमडले आहे यामुळे सर्व साधारण नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहे. ज्या वेळेस सधन व्यक्ती पाण्यासाठी पैसे देऊन पाणी घेतो परंतु सर्वसाधारण नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी पैसे देऊ शकत नाही. गेल्या सप्ताहापासून शहरातील पाण्याचे नियोजन पूर्णतः कोलमडले आहे. पाण्याच्या अभावामुळे मनपा रुग्णालयातील चार महिला भगिनीच्या प्रसुती सुध्दा थांबल्या होत्या यामुळे माता व बाळांचा जीव धोक्यात होता.

अग्निशमन विभागाची उडवाउडवीची उत्तरे
रुग्णालयातून अग्निशमन विभागास फोन केला असता उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले. तरी मनपा प्रशासनाने नागरिकांच्या जीवाशी खेळू नये नाही तर नागरिकांचा उद्रेक झाल्यास त्यास सर्वस्वी मनपा प्रशासनाची जबाबदारी राहील. मनपातर्फे पाण्याचे नियोजन होत नाही, पाईप लाईन फुटण्याचे प्रकार वारंवार होत असतात यात कोणाचे भले तर होत नाही ना? असा प्रश्‍न सामान्य नागरिकास पडत आहे. या गलथान कारभारास जबाबदार कोण? संबंधितांवर मनपा प्रशासन कारवाई करणार का? ज्या भागात जलवाहिनी फुटल्यानंतर ज्या भागात पाणी पुरवठा असेल त्या भागात नागरिकांना पूर्वसूचना देणे, टँकरने पाणी पुरवठा करणे, मनपाच्या पाणी पुरवठा होत असलेल्या विहिरींचे नियोजन व्यवस्था करणे हे प्रशासनाचे कार्य आहे याकडे मनपा प्रशासनाने काळजीपूर्वक लक्श्य द्यावे असा जाब जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी मनपा प्रशासनाला लेखी पत्राद्वारे केले आहे.