भविष्यात आंबेडकर जयंती साजरी होईल का? याची काळजी वाटते : गांधी

0

पुणे । सध्या लोकशाही व्यवस्था, न्यायालये खिळखिळी करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे राष्ट्राचे अस्तित्व राहील की नाही, की नव्या व्यवस्थेचे आपण गुलाम होऊ, याची काळजी आहे. पुढील काळात आंबेडकर जयंती साजरी करता येईल की नाही याचीही चिंता वाटतेे, असे स्पष्ट मत महात्मा गांधीचे पणतू तुषार गांधी यांनी केले. अशावेळी विघटनवादी विचारांवर मात करण्यासाठी सर्व समविचारी व्यक्ती, संस्थांनी एकत्र येऊन क्रांतीचा लढा दिला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुण्यातील क्रांतीज्योती संस्था आयोजित वैचारिक भीमजयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अन्वर राजन, डॉ. सिद्धार्थ धेंडे, वैशाली चांदणे, डॉ. अमोल देवळेकर, उमेश चव्हाण, विठ्ठल गायकवाड व्यासपीठावर उपस्थित होते.

नसलेला राम जोडत आहेत
गांधी म्हणाले, ज्या शक्तींनी बापूना मारले आणि बाबासाहेबांना बाजूला केले, सध्या त्याच शक्ती आंबेडकरांच्या नावात आतापर्यंत नसलेला राम जोडत आहेत. त्यांच्या मनातील डाव ओळखून त्यावर मात केली पाहिजे. बापूंचा राष्ट्रविचार आणि बाबासाहेबांच्या संविधान विचाराला याच शक्ती चूड लावू पाहत आहेत. जात, धर्म, प्रदेश, लिंग अशा विघटनवादी घटकांमध्ये आपण विभागले गेलो आहोत.

बापू-बाबासाहेबांमध्ये वैचारिक वैमनस्य नाही
गांधी आणि आंबेडकर या दोघांच्या डोळ्यासमोर या राष्ट्राच्या कल्याणाचा आणि सामान्य जनतेच्या पुनरुत्थानाच्या विचार होता. बापू आणि बाबासाहेब यांच्या विचारात वैमनस्य नाही. दोघांच्या डोळ्यासमोर मागास जनतेच्या पुनरुत्थानाचाच विचार होता. दोघांच्यात वैमनस्य असते तर संविधानाच्या निर्मितीसाठी महात्मा गांधींनी बाबासाहेबांची निवड केली नसती. आणि बाबासाहेबांच्या मनात द्वेष असता तर गांधींच्या प्रस्तावाचा स्वीकार केला नसता, असा विचार त्यांनी मांडला.