राज्याचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांचे प्रतिपादन
पिंपरी-चिंचवड : शाळांनी शंभर टक्के निकालापेक्षा विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढेल, यावर अधिक भर दिला पाहिजे. कारण गुणवत्ता खूप महत्त्वाची आहे. भविष्यात गुणवत्तेशिवाय दुसरा पर्यायच नसणार आहे. ज्या शाळा नवनवे उपक्रम राबवतील त्याच या आधुनिक व स्पर्धेच्या युगात टिकू शकतील. त्यासाठी शिक्षकांनी स्वत:हून जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी केले. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न शैक्षणिक संकुलाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मनोगत व्यक्त करताना म्हमाणे बोलत होते.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला उपकार्यवाह शरद इनामदार, नियामक मंडळाचे सदस्य यशवंत कुलकर्णी, अमिता किराड, राजीव कुटे, प्राचार्य डॉ. प्रवीण चौधरी, डॉ. शशिकांत ढोले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
जगण्यासाठी शिक्षणाची गरज
आपल्याला जगण्यासाठी शिक्षणाची गरज असते. आजच्या काळात पालकांचा आपल्या मुलांशी सुसंवाद कमी होत चालला आहे. अपेक्षित यशासाठी सौदा वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थी मानसिक तणावाखाली येत आहेत. शिक्षकच विद्यार्थ्यांची उपजत शक्ती जाणून घेऊन त्यांच्याशी भावनिक नाते जोडू शकतात. ज्ञान हे शिक्षकांच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांपर्यंत पोहचू शकते, असेही गंगाधर म्हमाणे यांनी सांगितले.
उपस्थितांच्या शंकांचे निरसन
उपस्थितांना मार्गदर्शन करताना गंगाधर म्हमाणे यांनी इयत्ता दहावी व बारावी बोर्डाचे कामकाज, मूल्यमापन व भविष्यातील गुणदान पद्धती याविषयी सविस्तर माहिती दिली. परीक्षा पद्धतीतील नव्या बदलांची त्यांनी कल्पना दिली. त्याचप्रमाणे उपस्थितांच्या शंकांचेदेखील निरसन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शरद इनामदार यांनी संस्थेच्या व संकुलाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
मॉडर्नची ओळख ‘संस्कारांचे संकुल’
आजच्या हायटेक युगातही शिक्षकांचे महत्त्व आणि जबाबदारी वाढली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबर सुज्ञ नागरिकांची निर्मिती, हीच राष्ट्रसेवा आहे. हे सेवेचे व्रत शिक्षकांनी अंगीकारले पाहिजे. या बाबी लक्षात घेऊन नाविन्यपूर्ण उपक्रम मॉडर्न निगडी शैक्षणिक संकुलात राबविले जातात. शिक्षणाबरोबर ’संस्कारांचे संकुल’ अशी मॉडर्नची ओळख होत आहे, असे मत शरद इनामदार यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल नवलपुरे यांनी केले. यादी वाचन वंदना धुमाळ यांनी तर आभारप्रदर्शन स्वाती देशपांडे यांनी केले.