पिंपरी-चिंचवड : दोघांमधील भांडण सोडवणे एका तरुणाच्या जिवावर बेतले आहे. भांडण सोडवण्याच्या कारणावरुन चार जणांनी एका तरुणाला कोयत्याने, काठीने आणि विटांनी मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा प्रकार रविवार दुपारी साडेबाराच्या सुमारास रामनगर चिंचवड येथे घडला. सागर नलावडे (वय-25 रा. चिंचवड) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी संतोष देवकर, सुनिल दौडकर, गोट्या देवकर, अविनाश कुसाळकर (सर्व रा. रामनगर, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
रॉड, काठी, वीटांनी मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोट्या देवकर आणि अनिल भरत पवार यांच्यामध्ये भांडण होते. हे भांडण सोडवण्यासठी सागर गेला होता. याच कारणावरुन आरोपींनी त्याला शिवीगाळ केली तर संतोष देवकर याने सागरच्या डोक्यात कोयत्याने दोन वार केले. तसेच सुनिल दौडकरने लोखंडी रॉड व गोट्या देवकरने काठीने मारहाण केली. तसेच अविनाश कुसाळकर याने या ठिकाणी पडलेल्या विटा सागरला मारल्या. या घटनेत सागर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला असून रात्री उशीरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नाही.पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील तपास करत आहेत.