पुणे : पुण्यातील ख्यातकीर्त भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर या संस्थेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार सुरू आहे. केंद्र सरकारने दिलेल्या निधी गैरवापर, पुरातत्व विभागाच्या अंतर्गत असलेल्या इमारतीमध्ये बदल करणे, झाडे तोडणे आणि मनमानी पद्धतीने संस्थेचा कारभार सुरू आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
या आरोपांची दखल घेत एका महिन्यात कारवाई करावी अन्यथा संस्थेसमोर आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. डॉ. सदानंद मोरे आणि प्रा. हरी नरके हे दोन पुरोगामी विचारवंत या संस्थेच्या कार्यकारिणीत आहेत. त्या दोघांनाही या गैरव्यवहाराविषयी माहिती दिली; मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. असे असेल, तर त्यांनी स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेऊ नये आणि तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही संघटनेने केली.