1996-98चा काळ, पुणे विद्यापीठात शिकत होतो. पुण्यात संध्याकाळी जाहीर कार्यक्रमाला जाण्याचा आणि भाषणं ऐकण्याचा नाद लागला होता. एक दिवस शनिवार पेठेत स्नेहसदनमध्ये भाई वैद्य यांचं जागतिकीकरणावर भाषण होतं. ऐकायला गेलो. आजपर्यंत ऐकलेल्या वक्त्यांमध्ये हा माणूस वेगळा आहे, हे जाणवले.
भाई वैद्य यांची ही जवळून पहिली भेट. ओळख करून घेतली आणि संधी मिळाली की त्यांचं काही ऐकायचं असा नाद जडला. भाईंच्या बोलण्याचं एक वैशिष्ट्य होतं. आवाज स्पष्ट, मोठा, धारदार. विचार टोकदार, पण तर्कसंगत असायचे. त्यामुळे पटायचे. बोलण्यातला आशय तर भलताच बंडखोर होता. त्यामुळे तरुणवयात अपील होणारं वक्तृत्व होतं त्यांचं.
जसजसं भाईंच्या जवळ गेलो, तसतसं कळत गेलं ते आणीबाणीनंतर पुलोदच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री होते. त्यांनी तीन लाख रुपये लाच देण्यासाठी आलेल्या स्मगलरला स्वत: सापळा रचून पकडून दिलं होतं. मंत्री पैसे खातात अशा काळात वाढलेल्या आम्हा मित्रांना हे ऐकून पैसे नाकारणारे भाई म्हणजे दंतकथा वाटत.पुढे कळत गेलं की, भाई 1942च्या ‘चले जाव’ चळवळीत बालवयात सहभागी झाले होते. ब्रिटिशांविरोधात लढणारा हा तरुण पुढे गोवा मुक्ती लढ्यातही झगडला. हा लढा समाजवादी नेते डॉ. राममनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली झाला. या लढ्यात लोहिया, मधु लिमये यांना बेदम मारहाण झाली. भाईंना डोक्याला मार लागला. रक्तबंबाळ झाले होते. एक हात जायबंदी झाला. त्यामुळे एक हात कायम अधू झाला.
आणीबाणीच्या काळात तर भाई पुण्याचे महापौर होते. आणीबाणीविरोधी त्यांनी शनिवारवाड्यावर सभा घेतली आणि त्यांना अटक झाली. त्यानंतर 19 महिने ते येरवड्याच्या तुरुंगात होते. आणीबाणीनंतर राज्यात पुलोदच्या सरकारमध्ये असताना त्यांनी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं म्हणून पहिला ठराव मांडला. पोलिसांच्या हाफ पँट बदलून फुल पँट केल्या. पोलिसांना त्यामुळे सन्मान मिळाला. त्याआधी ‘पांडू हवालदार’ म्हणून पोलिसांची टर उडवली जात असे. अनेक सासरे ‘माझा जावई पोलीस आहे’ हे सांगायला लाजत असत. भाईंचा पोलीस दलातले लोक खूप आदर करताना दिसत.भाई डॉ. लोहियांचा विचार मानणारे होते. महाराष्ट्रात त्यांनी समाजवादी नेते एस. एम. जोशी यांचं शिष्यत्व स्वीकारलं होतं. एसेमही त्यांना मानसपुत्र मानत असं बोललं जाई. एसेम यांच्या व्यक्तिमत्त्वाची झलक भाईमध्ये दिसे. एसेम यांच्यात असणारा प्रेमळपणा, मनमिळाऊ स्वभाव, समोरच्याचा मताचा आदर करणं, विचार आणि कृतीत जराही अंतर नव्हतं. जसे विचार, तशी कृती. सर्वांना सोबत घेऊन जाणारी वृत्ती. सत्तेच्या मोहापायी तडजोड करण्यास नकार. सत्ताग्राही न होता सत्याग्रही होणं. लोकशाही समाजवादी विचारांवर प्रामाणिक निष्ठा. त्यासाठी वाटेल ती किंमत चुकवायची सतत तयारी. आरशासारखं स्वच्छ जीवन.
समाजवादी पक्षांची नावं बदलली, मंच बदलले, पण भाईंनी 1942 साली समाजवादाचा झेंडा खांद्यावर घेतला तो शेवटपर्यंत खाली ठेवला नाही. ते राष्ट्र सेवा दलात घडले. सेवा दलातल्या सैनिकांचं आवडतं गाणं आहे – ‘सदैव सैनिका पुढेच जायचे, न तुवा कधी मागे फिरायचे’. भाई समाजवादाचा झेंडा घेऊन सैनिकासारखे सतत पुढेच जात राहिले. भाईंना शेवटचा निरोप देतानाही पुण्यात साने गुरुजी स्मारकाच्या मैदानात हेच गाणं सेवादल सैनिकांनी गायलं. भाई सर्व महत्त्वाच्या चळवळीत अग्रभागी राहिले. आणीबाणीनंतर जनता पार्टीच्या प्रयोगात ते पुढे होते. जनता पार्टी फुटल्यानंतर ते चंद्रशेखर यांच्यासोबत समाजवादी जनता पार्टीत होते. चंद्रशेखर यांच्यासोबत त्यांनी ‘भारत पदयात्रे’त सहभाग घेतला. या यात्रेत कन्याकुमारी ते दिल्ली असं जवळपास चार हजार किलोमीटर अंतर ते चालले. या यात्रेच्या संयोजनात भाईंचा महत्त्वाचा वाटा होता. 1990 नंतर मंडल आयोगाच्या चळवळीचं वैचारिक नेतृत्व त्यांनी केलं. मंडल आयोगाची आवश्यकता का, याविषयी त्यांनी एक अभ्यासपूर्ण पुस्तिका लिहिली. भारतातल्या ओबीसी जातींना न्याय मिळायला पाहिजे, यासाठी भाई आग्रही होते. शेतकरी, उत्पादक, पशुपालक, कारागीर जातींच्या हक्कासाठी तेव्हा भाईंनी महाराष्ट्र आणि देश पिंजून काढला होता.
1992नंतर भाईंनी परधर्म द्वेष शिकवणार्या अतिरेकी शक्ती आणि गरिबांचा गळा घोटणारी क्रूर भांडवलशाही या दोन्ही विरोधात रणशिंग फुंकलं. जागतिकीकरणविरोधी कृती समिती स्थापन करून त्यांनी राज्यभर दौरे केले. अक्षरक्ष: खेड्यापाड्यात ते जात. तालुक्याच्या गावात जात. जिथं जिथं संधी मिळेल, तिथं तिथं ते गेले. जागतिकीकरणाचा वरवंटा किती भयानक आहे, हे आकडेवारीनिशी पटवून देणं, हा त्यांचा एककलमी कार्यक्रम होता. परधर्मद्वेषी अतिरेकी शक्ती आणि जागतिकीकरणउदारीकरणखासगीकरणाचं (खाऊजा) धोरण यांना विरोध करण्यासाठी त्यांनी गांधीवादी, समाजवादी, कम्युनिस्ट, आंबेडकरवादी, नक्षलवादी, पर्यावरणवादी, स्त्रीवादी अशा विचारांच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना, विचारवंतांना आणि अभ्यासकांना लोकशाही समाजवादाच्या झेंड्याखाली एक होण्याचं आवाहन केलं. त्यानंतर सतत 25 वर्षे ते समाजवाद्यांच्या, परिवर्तनवाद्यांच्या एकीसाठी झटत राहिले.परिवर्तनवाद्यांच्या एकीसाठी त्यांनी सोशलिस्ट फ्रंट, समाजवादी जनपरिषद, सोशलिस्ट पार्टी हे पक्ष काढले. त्यांची अध्यक्ष, सरचिटणीस ही पदं भूषवली. या पक्षाच्या बांधणीसाठी ते देशभर फिरले.
बिहार विधानसभेची निवडणूक होती. भाई तिथं प्रचाराला जाणार होते. समाजवादी जनपरिषदेचे उमेदवार उभे होते. तेव्हा ‘साधना’ साप्ताहिकामध्ये मी लिहीत असे. डॉ. नरेंद्र दाभोलकर नुकतेच संपादक झाले होते. दाभोलकर मला म्हणाले, ‘भाईंबरोबर जातो का बिहारला? निवडणुकीचं वार्तांकन कर. त्यांच्याबरोबर फिर. शिकायला मिळेल.’ मी संधी समजलो. हो, म्हणालो. भाईंनाही बरं वाटलं. म्हणाले, ‘चल, मलाही मदत होईल, सोबत तू असलास की.’बिहारमध्ये भाईंबरोबर फिरताना खूप शिकायला मिळालं. भाई खूप टापटिपीत राहत. रंगीत खादीचा झब्बा, पांढरा घट्ट पायजमा. त्यांचे खादीचे शर्ट आकर्षक असत. भाई सतत खूप फ्रेश राहत. बिहारमध्ये तेव्हा समाजवादी जनपरिषदेने दहा ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्यांच्यासाठी प्रचाराच्या सभा होत. सभेला माणसं किती याची काळजी नसे. असतील त्या श्रोत्यांना समाजवाद, सध्याच्या राजकारणातले पेच, धर्मांधांचं देशावरचं संकट याची भाई जाणीव करून देत.
एकदा सीतामढी परिसरातल्या एका गावात सभा होती. सभा संपली, रात्र झाली. नऊ वाजले होते. पुढच्या गावी जायचं होतं. पण रस्ते नीट नव्हते. बसची सोय नव्हती. सायकल रिक्षा होत्या, पण आडवाट, अंधार, खराब रस्ते अशा अवस्थेत जाऊ नका, असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला. त्या गावात थांबायचं तर गेस्ट हाऊस, हॉटेल नव्हतं. अगदी छोटं गाव होतं. मग राहायचं कुठे? कार्यकर्ते गरीब, साधारण घरातले. एका कार्यकर्त्याच्या घरी थांबावं लागलं. जेवण उरकलं. अंगणात सतरंजीवर झोपावं लागलं. सकाळी उठल्यावर अंघोळ करण्याचा प्रश्न होता. कार्यकर्त्याच्या घरात न्हाणी वा बाथरूम असण्याचा प्रश्नच नव्हता. घरासमोर सार्वजनिक हातपंप होता. त्यावर पाणी हापसायचं आणि अंघोळ करायची. भाईंनी उत्साहानं बादली घेतली आणि अंघोळ केली. जराही कुरकूर, नापसंती नाही. आपण कुणी ग्रेट वगैरे आहोत, मंत्रीबिंत्री होतो, याचा कुठेही बडेजाव नाही. नेहमीसारखे फ्रेश होऊन भाई पुढच्या ठिकाणी जायला तयार झाले. असा आणि इतका साधेपणा त्यांच्याकडे होता.गेली 25 वर्षं भाई गावोगाव हिंडत होते. कार्यकर्ते घडवत होते. त्यांना लोकशाही समाजवादाची निकड पटवत होते. हा सारा काळ समाजवादी चळवळीच्या पडझडीचा होता. या पडझडीत निराश न होता लोकांना लढण्यासाठी उभं करणं हे सोपं काम नव्हतं. हे करताना यशापयशाची तमा न बाळगता भाईंनी असंख्य माणसं घडवली. म्हणून त्यांना लोक ‘जितंजागतं समाजवादी विद्यापीठ’ म्हणत. राष्ट्र सेवादलाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी मोलाचं काम केलं. गरिबांचं शिक्षण हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. लोहिया, एसेम यांच्या विचारांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. माणूस चारित्र्यवान आहे की नाही, हे जाणून घ्यायचं असेल तर त्याच्या हातात सत्ता द्यावी आणि मग पारख करावी असं म्हणतात. भाई सत्तेत होते. तिथं ते भ्रष्ट झाले नाहीत. सत्तेतून बाहेर पडल्यावर त्यांचं चारित्र्य अधिक झळाळून तळपलं. जवळ आलेल्या प्रत्येकाला त्यांनी प्रेम दिलं आणि समाजवाद सांगितला. त्यांना अखेरचा निरोप देताना ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ हे साने गुरुजींचं गाणं गायलं गेलं. ते अतिशय समर्पक होतं! खूप मोठा माणूस. या पुढे ते दिसणार नाहीत म्हणून काय झालं? त्यांचे विचार तर सोबत आहेतच की!
प्रेम दिलं, समाजवाद सांगितला
राष्ट्र सेवादलाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी मोलाचं काम केलं. गरिबांचं शिक्षण हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. लोहिया, एसेम यांच्या विचारांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. माणूस चारित्र्यवान आहे की नाही, हे जाणून घ्यायचं असेल तर त्याच्या हातात सत्ता द्यावी आणि मग पारख करावी, असं म्हणतात. भाई सत्तेत होते. तिथं ते भ्रष्ट झाले नाहीत. सत्तेतून बाहेर पडल्यावर त्यांचं चारित्र्य अधिक झळाळून तळपलं. जवळ आलेल्या प्रत्येकाला त्यांनी प्रेम दिलं आणि समाजवाद सांगितला.
– राजा कांदळकर
संपादक अक्षरनामा मुंबई
9987121300