भाऊराव सपकाळेंचा अपघाती मृत्यू

0

जळगाव । जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात होणार्‍या बैठकीसाठी येत असतांना कास्ट्राईब संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष तथा सल्लागार भाऊराव अभिमन्यू सपकाळे (वय 60) यांच्या दुचाकीला मागुन येणार्‍या एसटी बसने जोरदार धडक दिली. यात सपकाळे व त्यांच्यासोबत असलेले रमजान रसुल तडवी गंभीर जखमी झाले. मात्र, दोघांना उपचारार्थ दाखल केले असता उपचारा दरम्यान सपकाळे यांचा मृत्यू झाला. घटना शनिवारी दुपारी घडली.

संघटन बैठकीसाठी येत होते जळगावी…
भुसावळातील रानातला महादेव हुडको कॉलनीत राहणारे सपकाळे व रावेर येथील सेवा निवृत्त शिक्षक रमजान रसुल तडवी (वय 65) हे दोघे शनिवारी भुसावळ येथून दुचाकीने (एमएच 19 बीएल 2217) जळगावात जिल्हा परिषदेत संघटनेच्या बैठकीसाठी येत होते. दरम्यान, डॉ.उल्हास पाटील रूग्णालयाजवळ त्यांच्या दुचाकीला मागुन येणार्‍या एसटी बसने (एमएच 20 बीएल 2486) जोरदार धडक दिली. या धडकेत दोघे दुचाकीस्वार दुरवर फेकले गेल्यामुळे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर रस्त्यावरून जाणार्‍या इतर वाहनचालकांनी दोघांना डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना काही वेळातच सपकाळे यांची प्राणज्योत मालावली. तर तडवी यांच्यावर उपचार सुरू आहेत. सपकाळे यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.