पिंपरी-चिंचवड : कमी किंमतीत वस्तू घेऊन देतो तसेच भागिदारी देण्याचे अमिष दाखवून पाच जणांनी 23 नागरिकांची 41 लाख 55 हजार 147 रुपयांची आर्थीक फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. हा प्रकार ऑगस्ट 2017 पासून हॉटेल जयश्रीमध्ये सुरु होता. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अडुळकर, मोरे कुटूंबाविरोधात गुन्हा
जयेश संजय अडुळकर उर्फ बंटी (वय-23), तेजस अडुळकर (वय-21), जयश्री अडुळकर (वय-42 सर्व रा. मंजुळा मासुळकर पार्क, पिंपरीगांव), नंदु मोरे (वय-50, रा. गंगवा चौक, पिंपरीगांव), मुक्ताबाई चंद्रकांत मोरे (वय-65, रा. पिंपरीगांव) यांच्या विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. तर याप्रकरणी योगेश सुभाष नलावडे (वय-39, रा. ज्योती पार्क, नखातेवस्ती, रहाटणी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
खोट्या स्वाक्षरी करून धनादेश
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आलेल्या इसमांनी योगेश नलावडे यांच्यासह 23 जणांना कमी किंमतीत वस्तू देतो आणि भागिदारी देण्याचे अमिष दाखवले. यासाठी त्यांनी योगेश आणि इतरांकडून रक्कम घेतली. रक्कम घेऊनही वस्तू किंवा भागिदारी दिली नसल्याने योगेश यांनी पैशांची मागणी केली. त्यावेळी त्यांना खोटे बनावट धनादेश खोट्या सह्या करुन देऊन 41 लाख 55 हजार 147 रुपयांची आर्थीक फसवणूक केली.पिंपरी पोलीस तपास करत आहेत.