भाजपचा पराभव हा जनतेचा पंतप्रधान मोदी यांच्यावरील राग – राज ठाकरे

0

नाशिक: मध्य प्रदेश राजस्थानसह पाच राज्यांत झालेला भाजपचा पराभव हा जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील राग असून हा रागच मतांमधून बाहेर पडलाय अशी जोरदार टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली. मोदींनी देश जितका खड्ड्यात घातलाय, त्यापेक्षा जास्त कुणीही घालू शकत नाही. अगदी मायावतींनी ठरवलं तरी त्याही ते करू शकत नाहीत, असा टोलाही राज यांनी लगावला आहे. नाशिक येथे आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे बोलत होते

राज ठाकरे म्हणाले की, शिवसेना-भाजपच्या सभांना होणारी गर्दी आटली असून लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास उडत चालल्याचंच हे द्योतक आहे. ‘सेना-भाजपवाले काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा बेकार निघाले असंही राज म्हणाले. दरम्यान पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरी यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याबदद्ल विचारलं असता, ‘गडकरींच्या नावाची पंतप्रधानपदासाठी चर्चा करणारे बहुधा त्यांचे शत्रू असावेत, असं सूचक वक्तव्य राज यांनी केलं.

निवडणूका एकाच वेळी होण्याची शक्यता नाही

लोकसभा व विधानसभा निवडणूक एकाच वेळी होण्याची शक्यता राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली. भाजप एकाचवेळी भाजप फावडे आणि कुऱ्हाड पायावर मारून घेणार नाही. आधी फावडं मारून घेतील मग कुऱ्हाड, असंही राज ठाकरे यांनी सांगितले.