भाजपची शिवसेनेला मोठी ऑफर

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आगामी निवडणुकांवर लक्ष ठेवून भारतीय जनता पक्षाने मित्रपक्षांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तीन-चार वर्षांत भाजप-शिवसेनेचेही संबंध ताणले गेले आहेत. यापार्श्‍वभूमीवर शिवसेनेला खूश करण्यासाठी भाजपने राज्यसभेतील एका मोठ्या पदाची ऑफर दिली आहे. राज्यसभेचे उपसभापती पी. जे. कुरियन यांचा कार्यकाळ लवकरच संपत असून, 41 वर्षांपासून हे पद काँग्रेसकडे आहे. आता हे पद भाजप विरोधकांडून स्वतःकडे घेणार असून, ते मानाचे पद शिवसेनेला देण्यास भाजपश्रेष्ठी तयार आहेत. तसा प्रस्ताव ‘मातोश्री’वरही पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

संजय राऊत यांची लागू शकते वर्णी
राज्यसभेत शिवसेनेचे संजय राऊत, राजकुमार धूत आणि अनिल देसाई हे तीन सदस्य असून, संजय राऊत सर्वात अनुभवी आहेत. त्यामुळे शिवसेनेने ही ऑफर स्वीकारल्यास राऊत यांची वर्णी लागू शकते. शिवसेनेने प्रस्ताव नाकारल्यास हे पद भाजपचे भूपेंद्र यादव यांच्याकडे जाऊ शकते. दोन दशकांहून अधिक काळाची भाजप-शिवसेनेची युती 2014 मध्ये संपुष्टात आली होती. तेव्हापासून या दोन्ही पक्षात सतत कुरघोड्या, वाद सुरू आहेत. दोन्हीकडचे नेते एकमेकांवर संधी मिळताच शाब्दिक हल्ले चढवत असतात. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधूनही भाजपवर कठोर टीका केली जाते. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली जाते. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेला चुचकारणाचे धोरण भाजपने अवलंबले असून, मित्रपक्षाला खूश करण्यासाठी राज्यसभेच्या उपसभापतिपदाची ऑफर देण्यात आली आहे.

आली तरी ऑफर स्वीकारणार नाही!
भाजपकडून शिवसेना पक्षाला कोणत्याही प्रकारची व पदाची ऑफर आलेली नाही, आणि समजा ती आली तरी शिवसेना ती स्वीकारणार नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. मित्रपक्षाला जवळ करण्यासाठी भाजपात विविध पदे देण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे. त्यानुसार शिवसेनेला राज्यसभेचे उपसभापती देणार असल्याचे वृत्त आहे. मात्र, हे वृत्त निराधार असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेला जर उपसभापतिपद दिले तर इतर काही पक्षातील राज्यसभेतील पक्ष, सदस्य सेनेला पाठिंबा देतील असे गणित भाजपचे असल्याचे समजते. मात्र, शिवसेनेने भाजपच्या जाळ्यात न अडकण्याचे ठरवलेले दिसत आहे.