भाजपचे आघाडीच्या तर आघाडीचे भाजपच्या संपर्कात

0

भाजप आणि आघाडीकडून जि.प. सदस्य संपर्कात असल्याचे दावा-प्रतिदावा

जळगाव: जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समिती सभापती निवडीसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. नवीन वर्षात ३ जानेवारीला अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड होणार आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून अध्यक्ष तर जळगाव लोकसभा मतदारसंघातून उपाध्यक्ष करण्यावर भाजपची सहमती झाली आहे. रविवारपासून फोडाफोडीचे राजकारण टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून भाजपने सर्व जिल्हा परिषद सदस्यांना सहलीवर पाठविले आहे. दरम्यान आता राष्ट्रवादीचे चार आणि शिवसेनेचा १ जिल्हा परिषद सदस्य भाजपच्या गळाला लागल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळाली. भाजपने या पाचही सदस्यांना सहलीवर रवाना केल्याचे सूत्राने सांगितले.

त्या सदस्यांच्या अपात्रतेला स्थगिती?

जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने राष्ट्रवादीचा एक तर शिवसेनेचा एक असे दोन सदस्य अपात्र झाले आहे. दरम्यान राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने जि.प.निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या दोन सदस्यांच्या अपात्रतेला स्थगिती मिळणयाची शक्यता आहे. दोन्ही सदस्यांच्या अपात्रतेला स्थगिती मिळाल्यास महाविकास आघाडीची संख्या 34 वर पोहोचणार आहे. तसे झाल्यास भाजपकडे बहूमत राहणार नाहीण

राष्ट्रवादीचे ‘तेच’ सदस्य भाजपच्या संपर्कात?

२०१७ ला देखील भाजपने कॉंग्रेसच्या पाठींब्यावर आणि राष्ट्रवादीचे काही सदस्य गैरहजर राहिल्याने अध्यक्ष पद मिळविले होते. राष्ट्रवादीच्या चार सदस्यांनी गैरहजर राहून अप्रत्यक्ष भाजपला पाठींबा दिला होता. चारही सदस्यांचा अपघात झाल्याची बतावणी त्यावेळी करण्यात आली होती. मात्र तो भाजपने घडविलेला राजकीय अपघात होता ही चर्चा तेंव्हापासून कायम आहे. हेच चार सदस्य आताही भाजपच्या गळाला लागले आहे.

१ जानेवारी पासून आघाडी कामाला

राज्याच्या धर्तीवर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन जळगाव जिल्हा परिषदेवर देखील महाविकास आघाडीचा फॉर्म्युला यशस्वी करण्यावर चर्चा झाली. मात्र ती चर्चाच राहिली असल्याचे सध्याच्या राजकीय हालचालीवरून दिसून येते. कारण राष्ट्रवादीचे चार आणि शिवसेनेचा एक सदस्य भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा असताना महाविकास आघाडीकडून मात्र कोणत्याही हालचाली सुरु नाही. त्यातच कॉंग्रेसने भाजपसोबत जाण्यास अनुकुलता दर्शविले असल्याने महाविकास आघाडीचे स्वप्न भंगणार आहे.