पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या नवीन दोन क्षेत्रीय कार्यालयासह फेररचना झालेली एकूण आठ क्षेत्रीय कार्यालये क्रांतीदिनापासून (9 ऑगस्ट) अस्तित्वात येणार आहेत. याचदिवशी आठ प्रभाग अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. आठही क्षेत्रीय कार्यालयात भाजपचे बहुमत असल्यामुळे पक्षाच्या आठ नगरसेवकांच्या गळ्यात प्रभाग अध्यक्षांची माळ पडणार आहे. त्यामुळे आता हे आठ प्रभाग अध्यक्ष कोण होणार हे क्रांतीदिनादिवशीच स्पष्ट होणार आहे.
दोन क्षेत्रीय कार्यालये वाढली
महापालिकेची सहा क्षेत्रीय कार्यालये होती. लोकसंख्येच्या तुलनेत एकूण 11 क्षेत्रीय कार्यालये असणे अपेक्षित आहे. मात्र अपुरी कर्मचारी संख्या आणि कर्मचार्यांच्या वेतनापोटी होणारा भरमसाठ खर्च लक्षात घेता 11 क्षेत्रीय कार्यालये सुरू करणे महापालिकेला परवडणारे नाही. त्यामुळे सत्ताधारी भाजपने दोन नवीन क्षेत्रीय कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पिंपरी-चिंचवडमध्ये आता सहाऐवजी आठ क्षेत्रीय कार्यालये असणार आहेत. या नवीन दोन क्षेत्रीय कार्यालयांसह फेररचना करण्यात आलेली आठ क्षेत्रीय कार्यालये क्रांतीदिनापासून अस्तित्वात येणार आहेत.
बहुमतामुळे भाजप नगरसेवकांना लॉटरी
महापालिकेची निवडणूक चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार झाली. प्रभागांच्या भौगोलिक परिस्थितीनुसार प्रशासनाने आधीच्या सहा क्षेत्रीय कार्यालयांची फेररचना करून आठ क्षेत्रीय कार्यालयांची निर्मिती केली आहे. या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्रांतीदिनादिवशीच प्रभाग अध्यक्ष निवडण्यात येणार आहेत. सर्वच क्षेत्रीय कार्यालयांवर भाजपचे बहुमत आहे. त्यामुळे आठही प्रभाग अध्यक्ष भाजपचेच असणार हे जवळपास निश्चित झाली आहे. आता हे आठ प्रभाग अध्यक्ष कोण असणार हे 9 ऑगस्ट रोजीच स्पष्ट होणार आहे.