नवी दिल्ली । भारताच्या उत्तर, ईशान्यपूर्व भागात बस्तान बसवल्यावर भाजपने आता आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला आहे. भाजपचे दक्षिणेत बस्तान बसवण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी एक आराखडा तयार केला असून त्यांचा मिशन दक्षिण आराखडा वरिष्ठ नेत्यांकडे सोपवण्यात आला असल्याचे भाजपती ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले. या आराखड्याच्या माध्यमातून दक्षिणेतील आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामीळनाडू, केरळ आणि कर्नाटक या पाच राज्यांमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
आरएसएच्या वर्चस्वाचा फायदा
दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये भाजपचा प्रभाव नसला तरी त्याठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चांगले वर्चस्व मिळवलेले आहे. त्याचाच फायदा उचलून या राज्यांमध्ये भाजपची पाळेमुळे पक्की करण्याची योजना आहे. कर्नाटकात यावर्षी विधानसभेची निवडणूक आहे. ही निवडणूक भाजपसाठी अॅसिडटेस्ट असणार आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये विस्तार करताना अन्य पक्षातील प्रस्थापित नेत्यांना आपल्याकडे ओढणे, दुसर्या राज्यातील आपल्या नेत्यांना तिथे नेणे आणि लोकप्रिय चित्रपट कलाकारांना पक्षात घेणे व स्थानिक पक्षांना कमकुवत करणे हे ध्येय असल्याचे सांगितले जाते.
लोकप्रिय कलाकारांना पक्षात प्रवेश
दक्षिणेतील काँग्रेसचा प्रभाव आता कमी झाला आहे. त्यामुळे लोकांसमोर भाजप हा एकमेव पर्याय उपलब्ध असल्याचा येथील नेत्याचे मत आहे. लोकप्रिय चित्रपट कलाकारांना पक्षात घेतल्यामुळे फायदा होईल, असे भाजपच्या नेत्यांना वाटते. विशाल आणि विजय सारख्या अभिनेत्यांनाबरोबर घेतले जाण्याची शक्यता आहे.
द्रमुकच्या दुहीचा फायदा
मुख्यमंत्री जयललीता यांच्या मृत्यूनंतर तामीळनाडूत अण्णा द्रमुक पक्षात पडलेल्या दुहीमुळे तो पक्ष कमकुवत झाला आहे. याशिवाय जयललीता आणि करुणानिधी यांनी फसवणूक केली असल्याची भावाना तामीळनाडूच्या जनतेची झाली आहे. त्यामुळे तेथील जनतेला भ्रष्टाचारमुक्त प्रशासन पाहिजे आहे. त्यामुळे या मुद्द्यावर भाजपकडे लोकांचा ओढा वाढू शकतो, असे तामीळनाडू आणि कर्नाटकमध्ये भाजपचे सरचिटणीस पी. मुरलीधर राव म्हणाले.एम. के. स्टॅलिन हेही भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवताना दिसत नाहीत.