डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी दिल्लीतील एका कार्यक्रमात गुजरात निवडणुकीच्या मोडवर असलेल्या मोदींनी वेळ, ठिकाण याचा विचार न करता काँग्रेसवर सडकून टीका केली होती. यामुळे संतापलेले काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी मोदींसाठी नीच हा शब्द वापरला होता. या नीच शब्दाचा उपयोग करत मोदींनी गुजरात निवडणुकीत जातीय राजकारण करत काँग्रेसला अडचणीत आणण्याचा पुरेपुर प्रयत्न केला होता. मुळात मणिशंकर अय्यर यांनी मर्यादा ओलांडली हे मान्यच. उलट काँग्रेसने मणिशंकर अय्यर यांना पक्षातून तातडीने निलंबीत केले होते. आज भाजपमध्ये अनेक मणिशंकर दररोज वाटेल ती बेजबाबदार वक्तव्य करत आहेत. मोदी यांनी त्यांचीही दखल घ्यावी, अशी अपेक्षा असताना ते राहुल गांधींप्रमाणे बोलघेवड्यांवर कारवाई करताना दिसत नाहीत. याचा अर्थ मोदींची त्यांना मूक संमती आहे असे मानायचे का?
कथित गोरक्षकांकडून निष्पाप नागरिकांना जीवघेणी मारहाण होण्याचे प्रकार काही दिवसांपूर्वी संपूर्ण देशात घडत होते. या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाल्याने आणि काहींचे बळी गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या धर्मांध गोरक्षकांना हे प्रकार थांबविण्याचे आवाहन केले. मात्र, मोदी यांच्या आवाहनाकडे संबंधीतांनी दुर्लक्ष केले होते. मोदींचे ते ऐकणार नाहीत असे वाटत नाही. बहुतेक मी मारल्यासारखे करतो तु रडल्यासारखे कर, अशातीलच तो प्रकार होता असे वाटते. मागील तीन वर्षांपासून धर्मांधांनी कायदा हातात घेण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. आता तर भाजपचे नेते, खासदार, मंत्रीही हुकुमशहासारखे वागू, बोलू लागले आहेत. कुणी काय खायचे, कुणी काय प्यायचे, याचा निर्णय हे हुकुमशहा घेताना दिसतात. आमच्या विचारांना विरोध करणारे देशद्रोही असे समीकरणच या लोकांनी तयार केले आहे. आता तर भाजपचे मंत्री गोळ्या घालण्याची भाषा करू लागले आहेत. आपण भारतात आहोत की उत्तर कोरियात असा प्रश्नच पडावा, अशी वाक्य कानी पडतात. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी चंद्रपूर येथे केलेले विधान म्हणजे देशात हुकुमशाही असल्यासारखेच वाटते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूरमधील सरकारी रुग्णालयात अमृत दिनदयाल मेडिकल स्टोअरच्या शुभारंभासाठी हे मंत्रीमहोदय आले होते. यावेळी दोन प्रमुख डॉक्टर अधिकृतपणे रजेवर गेले होते. यामुळे अहिर यांचा पारा चढला. मी जनतेने निवडून दिलेला खासदार असून मी केंद्रीय राज्यमंत्रीपदावर आहे. मी इथे येणार हे माहित असूनही डॉक्टर रजेवर कसे जाऊ शकतात, त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसेल तर त्यांनी खुशाल नक्षलवादी संघटनेत भरती व्हावे, आम्ही गोळ्या घालून ठार मारु, असे वक्तव्य अहिर यांनी केले होते. या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर अहिर यांनी माफी मागीतली असली तरी गोळ्या घालण्याची त्यांची भाषा ही लोकशाहीला धरून नसून ती हुकुमशाही प्रवृत्ती आहे. डॉक्टरांच्या लोकशाहीवरील निष्ठेवर शंका घेणारे अहिर हे स्वत: लोकशाही किती मानतात हे त्यांच्या विचारावरून स्पष्टच होते. उठसुठ कुणालाही देशद्रोही ठरवायचे, नक्षलवादी ठरवायचे म्हणजे लोकशाही नव्हे. यापुर्वीही अनेक मान्यवर अशाप्रकारांना बळी पडले आहेत. केंद्रातील एक जबाबदार मंत्री असे बेजबाबदार वक्तव्य करत असताना भाजपचे नेतृत्व त्याची दखल घेत नाही, हे न उमजणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक गोष्टीची दखल घ्यावी अशी कुणाचीच अपेक्षा नाही. पण भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी तरी अशा बेजबाबदार मंत्री, नेत्यांना सुनावले पाहिजे. अन्यथा पक्षनेतृत्वाची अशा लोकांना मुकसंमती आहे असा संदेश यातून जाऊ शकतो. कारण असे प्रकार आता वारंवार घडू लागले असतानाही भाजप त्याची दखल घेत नाही हे अधिक चिंताजनक आहे.
केंद्रीय कौशल्य आणि विकास राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनीदेखील अहिर यांच्याप्रमाणेच आपली नसलेली अक्कल पाजळली आहे. या महाशयांनी तर जातपात मानली पाहिजे असा उघडपणे संदेशच एका कार्यक्रमातून दिला आहे. स्वतःला सेक्युलर, धर्मनिरपेक्ष म्हणवणार्यांना त्यांचे आई-बाप कोण हेदेखील ठाऊक नसते. स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेण्यापेक्षा धर्म आणि जातीच्या आधारावरच लोकांनी स्वतःची ओळख निर्माण करावी. कोणत्याही माणसाने त्याच्या धर्माप्रमाणे किंवा जातीप्रमाणे आपली ओळख मी हिंदू आहे, मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, ब्राह्मण आहे, लिंगायत आहे अशी करून दिली तर मला निश्चितच आनंद होईल. अशाप्रकारे ओळख करून दिल्याने आत्मसन्मान प्रस्थापित होतो. स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवाणार्या माणसांमुळेच समस्या निर्माण होतात, असे धर्मांध विचार हेगडे यांनी जाहिरपणे मांडले. यामुळे एकुणच या सरकारच्या पुढील वाटचाली बद्दल शंका उत्पन्न होऊ लागली आहे. हेगडे यांनाही भाजप नेतृत्वाने जाब विचारला नाही, यावरून काय ते स्पष्ट होतेच.
केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे विचार जर इतक खालच्या स्तरावरील असतील तर गल्लीबोळातील धर्मांध कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेत लोकांचे जीव घेतल्यास आश्चर्य वाटायला नको. जात, धर्म यापलिकडे सत्ताधारी जाण्यासच तयार नाहीत. त्यांच्या निवडणूक जाहिरनाम्यात तर असे काहीच नव्हते. मग भाजप हा छुपा अजेंडा राबवित आहे का? असा प्रश्न पडतो. भाजपने किमान मंत्रिमंडळातील मंत्र्यांना तरी जबाबदारीचे भान बाळगण्यास सांगितले पाहिजे. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्यावर तोंडसूख घेणारे भाजप नेतृत्व पक्षात अनेक मणिशंकर असताना त्यांच्याकडे का दुर्लक्ष करते? असेच दुर्लक्ष यापुढेही केले गेले तर पुन्हा नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी अशी तुलना लोकांनी केल्यास आश्चर्य वाटायला नको. कारण राहुल यांनी त्यांच्या मणिशंकर अय्यरांवर तातडीने कारवाई केली होती. मग, तुलना तर होणारच ना!