पुणे : राज्य आणि केंद्र सरकारच्या साडेचार वर्षातील विकासकामांची माहिती थेट मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुण्यात ‘जनसंवाद’ मोहीम हाती घेतली असून ती कमालीची यशस्वी होत आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी ‘जनशक्ति’शी बोलताना सांगितले.
आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी आणि संघटनात्मक बांधणी या दृष्टीने जनसंवादचा फार उपयोग होत आहे. गेले दीड, दोन महिने चाललेल्या या मोहिमेत शहरातील प्रभागवार बैठका घेतल्या जात आहेत. बूथ प्रमुख, बूथ सदस्य, पक्षाचे नगरसेवक, आणि स्थानिक पदाधिकारी यांना एकत्र केले जाते. प्रभागातील प्रश्न जाणून घेतले जातात. भाजप सरकारच्या कामगिरीविषयी मार्गदर्शन होते, कार्यकर्त्यांनाही भाषणाची संधी दिली जाते. याखेरीज केंद्र सरकारच्या उज्वला गँस योजना, मूद्रा बँक, दिव्यांगांना मदत अशा योजनेतील लाभार्थींच्या घरी जावून त्यांच्याशी संवाद साधला जातो, त्यांना काही अडचणी आहेत का ते जाणून घेतले जाते. असे या मोहिमेअंतर्गत होत असलेल्या कामाचे स्वरूप असल्याचे गोगावले यांनी सांगितले.
निवडणूक यंत्रणेच्या दृष्टीने बूथ कमिट्यांना पक्षात फार महत्त्व आहे. अन्य पक्षांच्या तुलनेत भाजप बूथ कमिटी स्थापन करण्यात आघाडीवर आहे. अशा बूथ कमिट्यांमुळे मतदारांशी थेट संपर्क रहातो. मतदानाच्या दिवशी त्याचा उपयोग होतो. इशान्य भारतातील त्रिपुरा राज्यात भाजपपुढे कम्युनिस्टांचे मोठे आव्हान होते पण, बूथ कमिट्यांमुळे भाजपला तिथे घवघवीत यश मिळाले. जनसंवाद मोहिमेच्या निमित्ताने पुण्यातही बैठकांमधून बूथ कमिटी रचनेचा आढावा घेतला जातो. त्रूटी असतील तर त्या भरून काढल्या जातात. या जनसंवादमधून पक्षाला काही नवीन तरुण वक्तेही मिळाले आहेत. जानेवारी महिन्यात कोपरा सभा आयोजित करून त्या सभांमध्ये या नवीन वक्त्यांना बोलण्याची संधी देण्याचा विचार आहे असे गोगावले यांनी सांगितले. प्रदेशातील दोन प्रमुख नेत्यांसमवेत पुणे, शिरूर आणि बारामती या मतदार संघातील पक्ष संघटनेचा आणि निवडणूक यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी पुण्यात बैठक झाली.
हे देखील वाचा