शिंदखेडा । शिवसेनेला कोणीही संपवू शकत नाही. शिवसेनेला संपविण्याची भाषा करणारे व सेनेला सोडून गेलेलेच संपून चालले आहेत. शिवसेनेला सोडून गेलेल्यांची काय अवस्था झाली आहे, हे तमाम महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहे व पाहत आहे. शिवसेना हा सर्व सामान्यांचा पक्ष आहे. सत्ता काय आज आहे उद्या नाही. शिवसैनिकांचे पाय जमिनीवर आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांसह भाजपाच्या सर्वच मंत्र्यांच्या डोक्यात सत्तेची हवा असल्याची घणाघाती टिका शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केले. शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार लताबाई माळी व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आयोजीत प्रचार सभेत ते बोलत होते. या सभेस संपर्क प्रमुख बबनराव थोरात, अलताफ शेख, माजी आमदार शरद पाटील, हेमंत साळूंखे, गुलाबराव वाघ, सर्जेराव पाटील,विश्वनाथ पाटील आदी उपस्थित होते.
एकदा संधी द्या
जीएसटीची अंमलबजावणी केली खरी परंतू सर्वसामान्यमध्ये या विषयी असलेले अज्ञान दूर करण्याची गरज आहे. निवडणूक आली की सर्वमान्य व्यक्तीला रिंगणात उतरविले जाते.शिंदखेडा नगरपंचायत निवडणूकीत देखील शिवसेनेने सर्वमान्य उमेदवार दिलेले आहेत. शहराचा मूलभूत गरजा प्राधान्याने पूर्ण करून शहराच्या विकासासाठी सेनेला एकवेळ संधी द्या, सत्ता मिळाल्यानंतर काम झाले नाही तर शिवसेनेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्याविरूध्द मोर्चा काढायला मी स्वतः तूमच्या सोबत असेन असा शब्द ना.गुलाबराव पाटलांनी शिंदखेडेकर वासियांना दिला.
शेतकर्यांचे हाल
पंतप्रधानांच्या नोटाबंदी निर्णयावर देखील त्यांनी टिका केली. या निर्णयानंतर बॅकेच्या रांगेत उभा राहणारा हा कुणी श्रीमंत नव्हता तर सर्व सामान्य नागरीक व शेतकरी होता. आज कधी बियाण्यांची पिशवी घेण्यासाठी तर कधी लाल्या रोगाचे पैसे घेण्यासाठी शेतकरी रांगेत उभा आहे. कापूस काढला परंतू भाव नसल्याने घरात पडून आहे. शेतकर्याची अतिशय बिकट अवस्था भाजपाने केली आहे. गुजरात मध्ये कापसाला असलेल्या भावापेक्षा पाचशे रूपये जादा भाव महाराष्ट्राच्या शेतकर्यांना कां देता येत नाहि असा सवाल ही त्यांनी केला.
काँग्रेस बुडते जहाज
कॉग्रेस हे बुडते जहाज आहे, कॉग्रेस विरहीत महाराष्ट्र करण्याचे काम सेनेने हाती घेतले आहे. भाजपा सरकारच्या मंत्रीमंडळात जरी असलो तरी चूकलेल्या निर्णयाला विरोध करायला घाबरत नाही. भाजपामध्ये निम्म्यापेक्षा अधिक आमदारांनी दत्तक घेतले आहे. शिवसेना हा असा एकच पक्ष ज्यात लोकप्रतिनिधींना घडविले जाते, त्याचेवर समाजकारणाचे व राजकारणाचे संस्कार केले जातात.