भाजपच्या पदाधिकार्‍यांना प्रशस्त दालनांचा मोह

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेत पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या भाजपच्या पदाधिकार्‍यांना प्रशस्त दालनांचा मोह पडल्याचे दिसून येत आहे. स्थायी समिती अध्यक्षांपाठोपाठ, महापौर, सभागृह नेत्यांनीही दालने विस्ताराला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, पारदर्शकतेच्या मुद्द्यावर सत्तारूढ झालेल्या भाजपने कोणतीही प्रशासकीय, आर्थिक मंजुरी नसताना दालने तोडफोडीचा उद्योग आरंभला आहे.

…तेव्हा भाजपकडून आरोप
तत्कालिन महापौर मंगला कदम यांच्या कार्यकाळात कार्यालयांचा कार्पोरेट लूक करण्यात आला होता. आयुक्त, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विषय समितींच्या सभापतींसह सर्व कार्यालयांचे नुतनीकरण करण्यात आले होते. त्यावेळी आरोप करणार्‍यांमध्ये भाजपचे पदाधिकारी पुढे होते. आता मात्र, सत्ता आल्यानंतर भाजपच्या पदाधिकार्‍यांना या गोष्टीचा विसर पडला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रथमच भाजपची सत्ता आली आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षांनी प्रथम आपले दालन मोठे करून घेतले. त्यानंतर महापौरांनी नवीन ’अ‍ॅटी चेंबर’ करून घेतले आहे.

दालनांच्या मुद्द्यावरून घमासान
सध्या विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयावरून महापालिकेत वाद सुरू आहे. विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी दालन अपुरे पडत असून, त्याऐवजी दुसरे प्रशस्त दालन देण्याची मागणी केली आहे. विरोधी पक्षाला महापालिका इमारतीच्या मुख्यालयातील दुसर्‍या मजल्यावर कार्यालय देण्यात आले आहे. विरोधी पक्षनेत्याचे दालन तोडून महापौरांचे दालन वाढविण्याचे काम करण्यात येणार असल्याची माहिती आहे. शहर सुधारण समिती किंवा विधी समितीचे कार्यालय विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयात स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्या जागेवर सभागृह नेत्याचे दालन वाढविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.