नवी दिल्ली । राष्ट्रपती निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला ’कांटे की टक्कर’ देण्यासाठी विरोधकांनी कंबर कसलेली असतानाच, भाजपने मात्र ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी रणनीती आखायला सुरूवात केली आहे. त्यानुसार भाजपनेते येत्या शुक्रवारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा करणार आहेत. राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार देऊ नये म्हणून भाजपनेते सोनिया गांधी यांना आग्रह धरणार असल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रपती निवडणुकीत प्रबळ उमेदवार देण्यासाठी श्रीमती गांधी यांनी नुकतीच सर्व विरोधी पक्षनेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला जवळपास सर्व विरोधी पक्षनेते उपस्थित राहिले होते. त्यामुळे आगामी काळात विरोधकांची तिसरी आघाडी स्थापन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यापार्श्वभूमीवर भाजपनेते सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याने या भेटीकडे सर्व राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रपतिपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी आणि सर्व राजकीय पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी भाजपने तीन नेत्यांची एक समिती स्थापन केली आहे. ज्येष्ठ भाजपनेते व्यंकय्या नायडू, राजनाथ सिंह आणि अरूण जेटली आदी नेते या समितीत आहेत. शुक्रवारी हे तिन्ही नेते सोनिया गांधी आणि सीपीएमचे नेते सीताराम येचुरी यांची भेट घेणार आहेत.
विरोधी पक्षांच्या हालचालीही वेगावल्या!
भारताचे 13 वे राष्ट्रपती निवडण्याच्या प्रक्रियेला बुधवारपासून सुरुवात झाली. ही सुरुवात काहीशी वेगाने होत असल्याचे दिसून आले. कारण राष्ट्रपतिपदासाठी एनडीएकडून कोण उमेदवार असणार? याचे उत्तर अद्याप गुलदस्त्यातच होते. मात्र आता त्या नावाची घोषणा होणार आहे. एनडीएचा राष्ट्रपतिपदासाठीचा उमेदवार 23 जूनरोजी घोषित केला जाणार आहे. भाजपच्या कोर कमिटीच्या सदस्यांच्या बैठकीत राष्ट्रपतिपदाचा उमेदवार ठरवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तर, दुसरीकडे विरोधी पक्षानेही राष्ट्रपतिपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे, जेडीयूचे शरद यादव, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, राजदचे लालूप्रसाद यादव, सीपीएमचे सीताराम येचुरी, बसपाचे सतीश मिश्रा या सगळ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये याबाबत चर्चा सुरू झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली एका कोर कमिटीची स्थापना करण्यात आली. तसेच उमेदवार कधी जाहीर होणार याची तारीखही निश्चित करण्यात आली आहे.
उमेदवार घोषित करूनच अमेरिकेवारी
एनडीएकडे 17 पक्षांचे पाठबळ आहे अशी माहिती राजनाथ सिंह आणि व्यंकय्या नायडू यांनी दिली आहे. बुधवारी झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत त्रिसदस्यीय समितीने त्यांची निरीक्षणेही नोंदवली आहेत. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएचे पारडे जड असणार आहे. 25 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौर्यावर जाणार आहेत. त्याआधी म्हणजेच 23 जूनला राष्ट्रपतिपदाचा उमेदवार कोण असेल ते जाहीर होणार आहे, असेही या बैठकीनंतर स्पष्ट करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. विरोधी पक्षांच्या गटात नेमके काय सुरू आहे याचा अंदाज एनडीएला घ्यायचा आहे. कारण विरोधकांतर्फे कोणाचे नाव सुचवले जाणार आहे हेदेखील अद्याप स्पष्ट झालेले नाही.