भाजपने भ्रष्टाचाराचा कळस गाठला, महापालिका बरखास्त करा!

0

पत्रकार परिषदेद्वारे शहर काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेत सगळा सावळा गोंधळ सुरु आहे. भारतीय जनता पक्षाच्या राजवटीला फेब्रुवारी महिन्यात एक वर्ष पूर्ण होईल. या वर्षात भाजपच्या कामकाजाची दिशा कळण्याऐवजी त्यांनी पालिकेची आणि शहरातील करदात्यांची दशा केली. 425 कोटींच्या कामात, वाकड येथील सीमाभिंत बांधण्याच्या कामात रिंग करुन करदात्यांच्या पैशांवर डल्ला मारला आहे. डल्ला मारणार्‍या पालिकेतील पदाधिकार्‍यांना त्यांच्या नेत्यांचे पाठबळ आहे. वर्षभरात भाजपने भ्रष्टाचाराची सीमा ओलांडली आहे, असा हल्लाबोल शहर काँग्रेसने केला. 425 कोटींच्या कामाच्या चौकशीचा केवळ फार्स नको. क्लीनचिटर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ’क्लीन’चिट द्यायला बसलेच आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका बरखास्त करण्यात यावी, अशी मागणीदेखील काँग्रेस पदाधिकार्‍यांनी केली. याबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना भेटून पालिका बरखास्तीची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वर्षभरातच भाजपचा चौपट भ्रष्टाचार
पिंपरी येथे गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, माजी महापौर कविचंद भाट, श्यामला सोनवणे, भोसरी ब्लॉकचे अध्यक्ष विष्णूपंत नेवाळे, मावळ लोकसभा मतदार संघाचे युवक अध्यक्ष अ‍ॅड. नरेंद्र बनसोडे, मयूर जयस्वाल, संग्राम तावडे, राजेंद्रसिंह वालिया, लक्ष्मण रुपनगर, गौतम आरकडे आदी उपस्थित होते. यावेळी साठे यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीकास्त्र डागले. ते म्हणाले, भाजपने निवडणूक जाहीरनाम्यात भ्रष्टाचारावर जोर दिला होता. आता मात्र एका वर्षातच भाजपने चारपटीने अधिक भ्रष्टाचार केला. भ्रष्टाचार लिहिण्यासाठी रकानेच्या-रकाने लागत आहेत. राष्ट्रवादीला भ्रष्टवादी म्हटले. भ्रष्टाचाराची चौकशी करु म्हटले होते. परंतु, एका वर्षात चौकशी काही झाली नाही. त्याऊलट राष्ट्रवादीतील भ्रष्ट लोकांनाच पक्षात पावण करुन घेतले, असा आरोपही साठे यांनी केला. 425 कोटींच्या, वाकड येथील सीमाभिंतीच्या कामात भाजपने रिंग केली आहे. भाजपने भ्रष्टाचार करण्यासाठी सीमाभिंतदेखील सोडली नाही. या भाजपच्या भ्रष्टाचाराला त्यांच्या पक्षातील लोकसुद्धा वैतागले आहेत. त्यांना पालिकेतील भ्रष्टाचार सहन होत नाही. त्यामुळेच त्यांनीच भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली आहे, असा टोलाही साठे यांनी हाणला.

शिवसेना या चोरांसोबत कशी?
विरोधकांनी ज्या ताकदीने सत्ताधार्‍यांविरोधात लढणे अपेक्षित आहे. त्या ताकदीने विरोधक लढताना दिसून येत नाहीत. शिवसेनेच्या भूमिकेबद्दल तर मोठा संभ्रम आहे. शिवसेना पालिकेत आरोप करते आणि केंद्रासह, राज्यात सत्तेत राहत आहे. चोरी झाली म्हणून शिवसेना आरोप करत आहे की वाटा मिळाला नाही म्हणून, असा सवालदेखील साठे यांनी उपस्थित केला. भाजप चोर आहे तर शिवसेना चोरांसोबत सत्तेत का राहत आहे. पालिका बरखास्तीची मागणी का करत नाही, असा सवालही सचिन साठे यांनी केला. मेट्रो आघाडी सरकारने आणली आहे. परंतु, त्यांना ती आता पुढे नेता येईना. पालकमंत्री म्हणतात पिंपरीपर्यंतच मेट्रो धावणार तर आमदार म्हणतात निगडीपर्यंत धावणार, कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. सहा हजार लीटर मोफत पाण्याची घोषणा म्हणजे आवळा देऊन कोहळा देण्याचा प्रकार आहे. भाजप प्रत्येक गोष्टीत जनतेची दिशाभूल करत आहे, असे टीकास्त्रही यावेळी काँग्रेस नेत्यांनी डागले.

425 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही. मुख्यमंत्री त्यामध्ये क्लीनचिट देणार आहेत. क्लीनचिट देण्यामध्ये ते पटाईत आहेत. पालिकेत होत असलेल्या भ्रष्टारामुळे पालिकाच बरखास्त करावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. याबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना भेटून पालिका बरखास्त करण्याबाबतची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार आहे.
– सचिन साठे, शहराध्यक्ष काँग्रेस