भाजपने 8 नोव्हेंबरला देशाची माफी मागावी : मोहन जोशी

0

पुणे । नोटाबंदीच्या निर्णयाला 8 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पुण्यात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर केलेले आरोप खोटे असल्याचे कबूल करत देशाची माफी मागावी. शिवाय काळ्या पैशाला पायबंद घातल्याचा दावाही खोटा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नोटाबंदीचा विचार दिशाहीन होता. नोटाबंदीमुळे दहशवाद, बनावट नोटा संपल्या नाहीत आणि काळा पैसाही अपेक्षेप्रमाणे उजेडात आला नसल्याचे उघडपणे सांगावे. हे सत्य जनतेला सांगण्याचे धारिष्ट्य जावडेकरांनी दाखविले असते तर अधिक चांगले झाले असते, अशी टिका प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार मोहन जोशी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाराद्वारे केली.

नोटबंदीचा निर्णय चुकीचा
नोटाबंदीमुळे काळापैसा उजेडात येईल, बनावट नोटा रद्द होतील व दहशवादाला आळा बसेल असे उद्दिष्ट्ये सांगितले जात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या या दाव्यामधील फोलपणा जनतेच्या लक्षात आला आहे. मोदी सरकारने केलेल्या नोटाबंदीमुळे नागरिकांचे आतोनात हाल झाले. नोटबंदीमुळे 4 ते 5 लाख कोटी रुपयाचा काळापैसा उजेडात आणणार, अशा वल्गना करणार्‍या भाजपाने हा निर्णय चुकीचा होता, हे आतातरी मान्य करणे गरजेचे आहे, असे जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

अच्छे दिनचे स्वप्न हवेत
काँग्रेसवर बेलगाम आरोप करायचे व आपला नाकर्तेपणा लपवायचा, हीच भाजपची सदैव रणनिती राहिली आहे. वास्तविक परदेशातील बँकांमध्ये भारतीयांचा काळा पैसा देशात आणण्यासाठी विविध देशांशी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली युपीए सरकारनेच करार केलेत व ते यशस्वी देखील झाले. व्हीडीएस योजना राबवून काळापैसा उजेडात आणला. याचे श्रेय काँग्रेसला देण्याचा मोठेपणा भाजपमध्ये नाही. परदेशातील भारतीयांचा काळा पैसा सत्तेत आल्यावर शंभर दिवसात आणू आणि प्रत्येक भारतीयांच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करु, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती. भाजपने अच्छे दिनचे स्वप्न दाखविले. गेल्या तीन-साडेतीन वर्षात अच्छे दिन आलेच नाहीत. त्यामुळे आता भाजपाला अच्छे दिन येतील, या भ्रमात भाजप नेत्यांनी राहू नये, असे जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

जाहीर माफी मागा
जनतेत मिसळून जनतेच्या मनाचा खरा कानोसा घ्यावा. नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाचे आर्थिक नुकसान झाले. पिकांचा दर घसरला, प्रगती मंदावली, लाखोंचे रोजगार गेले, औद्योगिक उत्पन्न घसरले, रांगेत उभे राहिल्याने 145 नागरिकांचा हकनाक बळी गेला, या सर्व गोष्टींबद्दल या 8 नोव्हेंबर रोजी भाजपने जनतेची माफी मागावी, ही भावना आता जनतेत सार्वत्रिकरित्या पसरली आहे, अशी मागणी मोहन जोशी यांनी केली.