भाजपपुढे प्रश्‍नच प्रश्‍न

0

दिल्लीपासून गल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाला लोक प्रश्‍न विचारू लागले आहेत. काँग्रेस पक्षाने गेल्या साठ वर्षात काय केले? काँग्रेसने देशात भ्रष्टाचार पोसला, अनेक समस्या सोडविण्याऐवजी ताटकळत ठेवल्या. त्यातून सोडवणूक करायची असेल तर मोदींना आणखी पाच वर्षाचा कालावधी द्यायला हवा, अशी उत्तरे भाजपकडून आणि त्यातही भक्तमंडळींकडून दिली जात आहेत. पण एवढे पुरेसे नाही, लोकांना विचाराची दिशा तरी स्पष्ट करायला हवी.

भाजपच्या केंद्रातील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा डाग नाही आणि महाराष्ट्रात मुख्य मंत्री देवेंद फडणवीस यांची राज्य कारभारातील कळकळ आणि स्वच्छ प्रतिमा या भाजपच्या निश्‍चितच जमेच्या बाजू आहेत. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी फडणवीस यांच्या प्रामाणिकपणाची प्रशंसा केली आहे, शिवाय फडणवीस यांच्यासारखे नेते हवेत अशी पुस्ती जोडली आहे.भाजप सरकारमध्ये प्रामाणिकपणा, भ्रष्टाचारविरहीत कारभार असला तरी लोकांना त्यांचे जीवनमान सुसह्य व्हावे, असे काही होणे अजून हवे आहे आणि तेवढीच लोकांची माफक अपेक्षाही आहे. त्यादृष्टीने त्यांनी प्रश्‍न विचारायला सुरुवात केली आहे.पुण्याचा विचार करायचा झाला तर भाजपला महापालिकेपासून उत्तर द्यावी लागणार आहेत. महापालिकेतील सभेच्या कामात सुधारणा व्हावी, अशा आशयाची सूचना भाजपच्या एका पदाधिकार्‍याने केल्यावर भाजपच्या अपयशाचे मुद्दे उपस्थित झाले. त्यावर समप्रमाण उत्तर भाजपच्या पदाधिकार्‍याला देता आले नाही. भाजपची हीच पंचाईत आहे की, मूळ मुद्द्याला उत्तर न देता विषय भरकटत न्यायचा ही खासियत झाली आहे. मेट्रोची दिखावू कामे चालू आहेत. पण ही मेट्रो नक्की कुठल्या मिळकतींमधून जाणार याचा तपशील लोकांना माहित नाही. भाजपच्या पदाधिकार्‍यांनी सांगितला नाही. हीच बाब त्या भुसारी कॉलनी उड्डाण पुलांची आहे. नितीन गडकरी आले आणि गेले. पुढे सारे ठप्प आहे. मुठा नदी सुधाणेचा मुहूर्त कधी लागणार हेही सांगता येत नाही. पीएमपी ताफा वाढविण्याचे काय झाले? असे अनेक प्रश्‍न आहेत. पुण्यातील कायदा सुव्यवस्था पार ढासळली आहे. गुंडांना प्रतिष्ठा मिळते आहे, याची पुणेकरांना खंत आहे. आमच्या पेठेतील शांतता भाजप नेत्याने घालविली, असे उद्गार मध्यवस्तीत ऐकायला येऊ लागलेत. संघ परिवाराने हात टेकल्याची कुजबूज आहे. फेरीवाले आणि वाहतूक या गंभीर विषयावर भाजप गप्प आहे.

याच दरम्यान नोटाबंदीच्या मुद्यावर भाजपला घेरले गेले आहे. नोटाबंदीचा निर्णय सर्वस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा होता. त्यात जे प्रश्‍न उपस्थित होताहेत त्यात काँग्रेसला ओढता येत नाही. त्यामुळे भाजपला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागतोय. पुण्यात तर बाबा आढावा यांच्या नेतृत्वाखाली कष्टकरी संघटना नोटाबंदीच्या विरोधात उतरत आहेत. भाजप याला उत्तर कसे देणार? मोदी यांच्या नोटाबंदीच्या समर्थनासाठी अपक्ष खासदार संजय काकडे पुढे आले होते. आता भाजप नेते या अपक्ष खासदारांची मदत घेऊन काँग्रेसला उत्तर देणार का? असे पक्षांतर्गत प्रश्‍नही भाजपपुढे उभे आहेत.

– राजेंद्र पंढरपुरे
9623442517