पालकमंत्री गिरीश बापट यांची जीभ पुन्हा घसरली
फोनवर बोलणार्या कार्यकर्त्याला जाहीरसभेत झापले
पुणे : भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तर आमदारकी-खासदारकी आणि मंत्रिपदही मिळू शकते, हे सर्वांना अनुभवले असेल. एवढेच नव्हे तर तुम्ही आरोपी असले तरी तुम्हाला क्लीनचिटही मिळू शकते. परंतु, भाजपमध्ये प्रवेश केला तर तुम्हाला नोकरीही मिळू शकते, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनीच जाहीर सभेत दिली आहे. त्यासाठी अट फक्त एकच आहे, बायको मात्र एकच करावी लागते! पुण्यात पार पडलेल्या जाहीरसभेत एका कार्यकर्त्याला झापताना ना. बापट यांनीच ही माहिती उघड केली. फोनवर बोलणार्या कार्यकर्त्याला झापण्याच्या नादात, ना. बापट यांची जीभ पुन्हा एकदा घसरल्याचेही निदर्शनास आले.
सर्वांसमोर केला कार्यकर्त्याचा पाणउतारा!
पुण्यातील सेव्हन लव्हज चौक ते मार्केटयार्ड (वखार महामंडळ)पर्यंत सुमारे साडेसहाशे मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या पुलाचे भूमीपूजन पालकमंत्री गिरीश बापट यांच्याहस्ते शुक्रवारी झाले. यावेळी पार पडलेल्या जाहीरसभेत बोलण्यासाठी बापट उभे राहिले असता तेथे एक कार्यकर्ता फोनवर बोलताना त्यांना दिसला. त्याला पाहून बापट यांनी चांगलेच झापण्यास सुरुवात केली. ना. बापट म्हणाले, होऊ दे भाऊ, तुझा फोन होऊ दे. बायकोशी घे बोलून तेवढं! बिगर लग्नाचा असशील तर मग् भाजपात ये, तुला रोजगार देतो, नोकरी देतो, फक्त लग्न एकच करं. अशा शब्दांत या कार्यकर्त्याचा ना. बापट यांनी जाहीर पाणउतारा केला. त्यामुळे हा कार्यकर्ताही चांगलाच हिरमोड झाला व तेथून निघून गेल्याचे दिसून आले. या कार्यक्रमाला महापौर मुक्ता टिळक, महापालिकेचे सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांचीदेखील उपस्थिती होती.
वादग्रस्त वक्तव्ये करण्याची ना. बापटांची खोडच जुनी!
अशा प्रकारे जाहीर सभेत वादग्रस्त विधाने करण्याची पालकमंत्री बापटांची खोड तशी जुनीच आहे. यापूर्वीही त्यांनी विद्यार्थ्यांच्या जाहीर कार्यक्रमात ‘तसल्या क्लिपा आम्हीपण पाहतो, आम्ही पिकलेलं पान असलो तरी आमचे देठ हिरवे आहेत’, असले काहीसे वक्तव्य करून वाद ओढवून घेतला होता. त्याची राज्यभर चर्चा झाली होती. त्यानंतर त्यांचा एक वादग्रस्त फोटोदेखील व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. अलिकडेच, शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी विद्यार्थिनींना उद्देशून ‘चल म्हटली की लगेच चालली’ असले वक्तव्य केले होते. त्यामुळे विद्यार्थिनींनी माना शरमेने खाली घातल्या होत्या. आतादेखील भाजपात ये, तुला नोकरी देतो, फक्त बायको एकच कर असे वादग्रस्त विधान करून त्यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.