’भाजपमय’ भारताच्या दिशेने!

0

भाजपला 2014 मधील देशाची एक हाती सत्ता प्राप्त झाली आणि संघ परिवारातील सर्वच संघटनांमध्ये एक नवचैतन्यच आले आणि त्या भाजपला विजयी करण्यासाठी एक दिलाने काम करू लागल्याचे दिसत आहे. अच्छे दिन, परदेशातील काळा पैसा देशात परत आणून प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख जमा करू, दरवर्षी दोन करोड बेरोजगारांना रोजगार देणार, अशी आश्‍वासने देऊन भाजपने देशात सत्ता मिळवली. सत्तेवर आल्यावर काँग्रेसमुक्त भारत, शत-प्रतिशतचा नारा, अशा सारख्या घोषणा देऊन भाजपने आपली दिशा स्पष्ट केली. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी भाजपला पूर्णपणे आपल्या नियंत्रणात ठेवता यावे यासाठी आपले जवळचे सहकारी अमित शहा यांची भाजप अध्यक्ष म्हणून निवड करवली तसेच पक्षातील वयोवृद्धांना सक्तीची विश्रांती देण्यात आली. यासाठी संघाकडून नरेंद्र मोदी यांना पूर्णपणे मोकळीक दिली गेली आहे.

कालच्या तीन राज्यांतील निवडणूक निकालानंतर आता भाजप 21 राज्यांमध्ये सत्तेवर आहे. मेघालयातही ते गोव्यात वापरलेल्या कुटनीतीचा अवलंब करून सत्ता मिळवतील.देशातील सर्वात जुन्या ऐतिहासिक काँग्रेस पक्षाची वाताहत मात्र सुरूच आहे. गुजरात निवडणुकांनंतर आणि नेतृत्व बदलानंतर काही प्रमाणात काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीत काही सकारात्मक बदल झाल्याचे दिसते, पण ते काँग्रेसला निवडणुकीत यश मिळवून देण्यास पुरेसे नाही हेही स्पष्ट झाले तसेच काँग्रेसमध्येे टीम वर्क म्हणून सर्व नेते पक्षासाठी काम करत आहेत, असे अजूनही दिसत नाही. जवळपास सर्वच नेते आपापली सुभेदारी राखण्याचे काम करत आहेत. खरे तर गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर अनेक आक्षेप असूनही या जोडगोळीने निवडणूक जिंकण्याचे एक अजब तंत्र आत्मसात केले आहे आणि ते एक एक राज्य पादांक्रांत करत आहेत.

एकंदरीतच देशाची वाटचाल एक पक्षीय सरकारकडे चालू असल्याचे दिसते आहे. लोकशाहीमध्ये प्रबळ विरोधी पक्ष असणे अत्यंत आवश्यक आहे. पण दुर्दैवाने आज भाजप समोर कुठलाही तुल्यबळ विरोधी पक्ष आहे असे वाटत नाही. काँग्रेस पक्ष आणि पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी याचा गांभीर्याने विचार करून आपल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळेल असे नेतृत्व द्यायला हवे. देशातील इतर प्रादेशिक पक्ष हे काही भाजपला टक्कर देऊ शकत नाही. डाव्यांचे अस्तित्व हेसुद्धा आता केरळपुरतेच उरले आहे. तिसर्‍या आघाडीचे त्रांगडेच आहे. भाजपच्या आव्हानापुढे इतर सगळेच पक्ष आपापले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहे. अशा स्थितीत दोन राष्ट्रीय पातळीवरील तुल्यबळ पक्ष असणे, हे लोकशाही टिकवण्याच्या दृष्टीने गरजेचे आहे. मोदी यांचा एक चालकानुवर्ती स्वभाव पाहता ही गरज स्पष्ट पण अधोरेखित होते.

तेव्हा 2019 मध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीत देश खरोखर काँग्रेसमुक्त होतो की, काँग्रेस आपले अस्तित्व टिकवून ठेवत,े हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. पण या सर्व गडबडीत देशातील सामान्य जनतेला अजून तरी अच्छे दिन आल्याचा अनुभव आला नाही. त्यांचे रोजचे जगणे महागाईच्या आगडोंबातच होरपळून निघत आहे, हे सत्य आहे.

– अनंत बोरसे
शहापूर जिल्हा ठाणे.
9158495037