भाजपमुळे आले शेतकर्‍यांना वाईट दिवस

0

निमच । मध्य प्रदेशातील मंदसौर येथे पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेल्या शेतकर्‍यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जाणार्‍या काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह 29 नेत्यांना गुरुवारी नीमचच्या सिमेवर अटक करुन नंतर त्यांची सुटका करण्यात आली. नीमचचे पोलिस अधिक्शक मनोज सिंग म्हणाले की, जिह्यात प्रवेशबंदी असल्यामुळे शांतता भंग होऊ नये म्हणून राहुल गांधी आणि 29 नेत्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने गांधी यांच्यासह इतरांची जामिनावर मुक्तता केली. जामिनावर सुटलेल्या राहुल गांधींना राजस्थानच्या सिमेवर सोडण्यात आले आणि तिथे मृत शेतकर्‍यांची भेट घेण्याची परवानगी देण्यात आली.

दरम्यान शेतकर्‍यांच्या या अवस्थेला मोदी सरकार जबाबदार आहे. त्यांना शेतकर्‍यांच्या समस्यांशी काहीही घेणेदेणे नाही अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांना रोखण्यात आल्यानंतर त्यांनी मोदी सरकारविरोधात ट्विट करून आपला निषेध नोंदवला आहे. देशातल्या कोणत्या कायद्याचा आधार घेऊन पोलीस आणि प्रशासन मला रोखत आहेत? असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला आहे. इतकंच नाही तर जे शेतकरी गोळीबारात मारले गेले आहेत त्यांच्या कुटुबियांना माझा पाठिंबा आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेश सरकारने मला रोखण्यासाठी कसून प्रयत्न चालवले आहेत हे योग्य नाही अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली आहे. मंदसौरमध्ये राहुल गांधी यांना जायचे होते. मात्र त्यांचे विमान मंदसौरमध्ये उतरण्यास मज्जाव करण्यात आला. ज्यानंतर राहुल गांधी उदयपूर विमानतळावर उतरले आणि तेथून मोटरसायकलने मंदसौरमध्ये जात होते. मात्र त्यांना निमचमध्ये रोखण्यात आले आणि ताब्यातही घेण्यात आले. राहुल गांधींना बुधवारीच मंदसौरचा दौरा करायचा होता. मात्र त्यांना प्रशासनाने परवानगी नाकारली होती.

केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी राहुल गांधी फक्त प्रसिद्धीसाठी ही स्टंटबाजी करत आहेत अशी टीका केली आहे. तसेच जोवर मंदसौरमध्ये वातावरण निवळत नाही तोवर राहुल गांधींनी तिकडे जाऊ नये असाही सल्ला दिला आहे. तर शेतकर्‍यांच्या वाईट अवस्थेसाठी भाजप सरकार जबाबदार आहे अशी टीका काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी केली आहे. त्यामुळे आता राहुल गांधी यांच्या मंदसौर दौर्‍यावरूनही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे.