पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या परशुराम वाघमारे यानेच केल्याचा निष्कर्ष या प्रकरणाचा तपास करणार्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) काढल्याने खळबळ उडवून देणारा हा विषय एका नव्या वळणावर येऊन ठेपला आहे. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन श्रीराम सेनेची वक्तव्ये येऊ लागली आहेत. सीआयएने बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेला दहशतवादी संबोधले आहे. या सार्या भाजपच्या पोट संघटना आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेते अमित शहांना देशात आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर उभे राहताना या सार्याचा जाब द्यावा लागणार आहे.
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या परशुराम वाघमारे यानेच केल्याचा निष्कर्ष या प्रकरणाचा तपास करणार्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) काढल्याने खळबळ उडवून देणारा हा विषय एका नव्या वळणावर येऊन ठेपला आहे. धर्मरक्षणासाठी आपण हत्या केली, असे स्पष्टीकरण आरोपीने दिले आहे, तर त्याच्या समर्थनार्थ श्रीराम सेना मैदानात उतरली आहे. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन श्रीराम सेनेची वक्तव्ये येऊ लागली आहेत. श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येवरून अत्यंत वादग्रस्त विधान केले. ‘कर्नाटकात एखाद्या कुत्र्याचा मृत्यू झाला, तर त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार कसे?,’ असे वादग्रस्त वक्तव्य प्रमोद मुतालिक यांनी केले. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि गोवा अशा पाच राज्यांमध्ये पसरलेली ही साठ जणांची कथित टोळी कशी काम करत असावी, यावर प्रकाश पडू शकेल. कडव्या हिंदुत्ववादी संघटनांमधून या संघटनेची सदस्य भरती होत असून, त्यांच्या धर्मवेडेपणात हिंसाचाराचे तेल ओतण्याचा हा सूत्रबद्ध कट असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. सराईत गुन्हेगारही काही माग सोडतात, असा पोलिसांचा अनुभव सांगतो. पण या कथित संघटना आणि या हत्याची कार्यपद्धती पाहिली, तर किती थंडपणे योजना आखून ही कृत्ये होत असावीत, याचा अंदाज येतो. लंकेश यांचे मारेकरी समोर आल्यानंतर साहजिकच यापूर्वी झालेल्या हत्यांच्या तपासाचे काय, असा प्रश्न उपस्थित होतो. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात हत्या होऊन पाच वर्षे लोटली. त्यानंतर पानसरे आणि कलबुर्गी यांच्या ठरावीक पद्धतीने हत्या झाल्या.
महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष पथकासह विविध यंत्रणा त्यांचा तपास करत असल्या, तरी त्यांच्या हाती अद्याप फारसे काही लागलेले नाही. दाभोळकर कुटुंबासहित विविध पुरोगामी कार्यकर्ते या हत्येचा तपास लावण्याच्या मागणीसाठी दरमहा निदर्शने-आंदोलने करत आहेत. त्याबरोबरच या घटनांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही अनेकदा झडल्या आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस आघाडीचे सरकार होते, तेव्हाचा विरोधक असलेल्या भाजपने हत्यांवरून कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उभे केले होते. सध्या कर्नाटक वगळले, तर या चारही राज्यांमध्ये भाजपची सरकारे आहेत. त्यामुळे कर्नाटक पोलिसांना लंकेश यांच्या मारेकर्यांचा छडा लागतो, आणि महाराष्ट्रात चार वर्षे लोटल्यानंतरही या हत्याचा तपास पुढे का सरकत नाही, या प्रश्नाला सरकारकडे सध्यातरी उत्तर नाही. आता महाराष्ट्र सरकारची विशेष तपास पथकाची टीम कर्नाटकात पोहोचली आहे. एकाच रिव्हॉल्व्हरने या सार्या हत्या झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. म्हणून ते वाघमारेला ताब्यात घेण्यासाठी गेले आहेत. ’लंकेश कोण, हे आपल्याला ठाऊकही नव्हते. धर्मरक्षणासाठी एक खून करावयाचा आहे, असे आपल्याला सांगण्यात आले होते’, ही वाघमारेची कबुली अधिक धक्कादायक आहे तसेच गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्यासह लंकेश यांच्या हत्या एकाच पिस्तुलातून करण्यात आल्याचे एसआयटीने म्हटल्यामुळे पुरोगामी विचारवंतांच्या या खूनसाखळीत एक सूत्र असल्याच्या आरोपांना पुष्टी मिळते. त्याबरोबरच वाघमारेकडून मिळालेली संघटित टोळीची माहिती चिंताजनक आहे, अशा सार्या कडव्या धर्मांध संघटनांना भाजपच खतपाणी घालत असल्याचा आरोप आता सर्व बाजूंनी होत आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे भाजपविरोधी वातावरण तापत असून देशभरात ग्रामीण जनता, दलित समाज भाजपवर अत्यंत नाराज आहे.
भाजप नेत्यांनाही या अंडरकरंटचा अंदाज येऊ लागला आहे. म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपनेत्यांना काही कानपिचक्याही दिल्या आहेत. भाजपशासित तीन राज्यांच्या आगामी निवडणुका व 2019ची लोकसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर सतारूढ भाजपच्या नेतृत्वाला संघाच्या नेत्यांसमोर शरणागती पत्करली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही भाजपला, आता ‘उत्तम समन्वय आवश्यक’ असल्याचा व ग्रामीण भारतासह दलितांमधील संतप्त भावनेबद्दल सावधानतेचा इशारा दिला आहे. दिल्लीजवळच्या सूरजकुंड येथील संघाच्या तीन दिवसांच्या बैठकीत भाजप अध्यक्ष अमित शहा सहभागी झाले. संघाची तीन दिवसांची वार्षिक बैठक सूरजकुंड येथे सुरू आहे. तिथे आता शहा यांना कानपिचक्या दिल्या जात आहेत. विरोधकांची महाआघाडी दृष्टिपथात असताना त्याला प्रत्युत्तर म्हणून संघ व भाजपमधील समन्वय अगदी गावपातळीपर्यंत चोख करण्यावर भर दिला जातो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भोजनाच्या निमित्ताने संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी व समन्वयक कृष्णगोपाल यांच्याबरोबर खलबते केली. मोदी सरकारच्या योजनांबाबत संघ संतुष्ट असला, तरी त्यांच्या अंमलबजावणीबाबत चांगले फीडबॅक संघ वर्तुळातूनही मिळालेले नाहीत. केंद्रासह राज्याराज्यांतील भाजप सरकारांबाबतची प्रतिकूल भावना, शेतकरी व दलितांमधील नाराजी व दहशतीचे वातावरण, महाराष्ट्रासह अनेक भाजप राज्यांत दलितांवरील वाढते प्राणघातक हल्ले व ते रोखण्यात भाजप सरकारला आलेले संपूर्ण अपयश या सार्या बाबी सूरजकुंड मंथनानिमित्ताने भाजप नेतृत्वाच्या कानावर घालण्यात आल्या आहेत. याच बैठकीत भाजप नेत्यांना आणि भाजपप्रणीत संघटनांच्या म्होरक्यांना वाचाळपणाला लगाम घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याला आवर घातला नाही तर मोठा फटका बसू शकतो, असा भाजपमधील तज्ज्ञांचा कयास आहे.
यानिमित्ताने का होईना भाजपनेत्यांचे आणि भाजपशासित राज्यांच्या म्होरक्यांचे डोळे उघडतील. गौरी लंकेश, कलबुर्गी, पानसरे व डॉ. दाभोळकर यांच्या हत्येचा धागा लोकांसमोर हळूहळू उघड होत आहे. लोकांचा संशय ज्या कडव्या धर्मांध संघटनांवर होता त्यांचेच हे कृत्य असल्याच्या गोष्टीवर आता शिक्कामोर्तब होऊ लागले आहे. ‘सीआयए’ (सेन्ट्रल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी) या अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने यावर्षी प्रसिद्ध केलेल्या ‘वर्ल्ड फॅक्ट बूक’मध्ये ‘विश्व हिंदू परिषद व बजरंग दल’ या धार्मिक आतंकवादी संघटना आहेत, असे जाहीर करून आंतरराष्ट्रीयस्तरावरही यावर शिक्कामोर्तब केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप नेते अमित शहांना पुन्हा सत्तेवर येताना व आंतरराष्ट्रीयस्तरावर उभे राहताना या सार्याचा जाब द्यावा लागणार आहे.