भाजपला मुका न दिल्यास शिवसेनेला शिरुर, मावळात फटका?

0

युती न झाल्यास भाजपला फायदा, विधानसभेसाठी राष्ट्रवादीला लाभ!
आगामी निवडणुकांत राजकीय समीकरणे बदल्याची चिन्हे

पिंपरी-चिंचवड : भारतीय जनता पक्षाशी युती होणार नसल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली असतानाच, भाजपकडून मात्र युतीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तथापि, शिवसेनानेते व पक्षप्रवक्ते खा. संजय राऊत यांनी भाजपने मुका घेतला तरी, आगामी निवडणुकांत युती होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मावळ व शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेलाच फटका बसणार असल्याचे तूर्त राजकीय चित्र आहे. या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचे खासदार असून, भाजपकडून भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यासारख्या प्रबळ उमेदवाराला शिरूर मतदारसंघातून उभे करण्याची औपचारिकता पूर्ण झाली आहे. तर मावळ मतदारसंघातून चिंचवडचे आमदार तथा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांना उभे केले जाणार आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीनेदेखील सक्षम उमेदवार न देण्याची खेळी रचली असून, त्याचा फटका अर्थातच शिवसेनेला बसणार आहे. दुसरीकडे, लोकसभेच्या बदल्यात भोसरी व चिंचवडची जागा राष्ट्रवादीला सेक्युअर हवी असल्याची माहितीही वरिष्ठस्तरीय सूत्राने दिली आहे. भोसरीतून माजी आमदार विलास लांडे तर चिंचवडमधून शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना उभे करण्याची खेळीही राष्ट्रवादीकडून खेळली जाणार असल्याचे संकेत सूत्राने दिले आहेत. भोसरीत कामगारवर्गाची मते विभाजित करण्यासाठी शिवसेनेच्या कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष इरफान सय्यद यांना मैदानात उतरविले जाऊ शकते, असेही सांगण्यात आले.

मावळ, शिरुरमध्ये भाजपचे दमदार उमेदवार!
पिंपरी-चिंचवडचा दोन लोकसभा आणि तीन विधानसभा मतदारसंघात समावेश होतो. मावळ आणि शिरूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपने आपली पाळेमुळे घट्ट केली आहेत. विशेषतः मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपचाच विजय होईल, अशी राजकीय परिस्थिती आहे. भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप या मतदारसंघातून लोकसभेत जाण्यासाठी बाह्या सरसावून तयार आहेत. त्यामुळे जगताप यांची उमेदवारी शिवसेनेला जड जाऊ शकते. शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार यावरच भाजप की शिवसेना विजय होईल, याचा राजकीय अंदाज बांधता येणार आहे. शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविषयी नाराजी वाढली आहे. त्यामुळे याठिकाणी भाजपने आमदार महेश लांडगे यांच्यासारखा तगडा उमेदवार देण्याचे निश्‍चित केले आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरत असते. आ. जगताप व आ. लांडगे हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते आहेत. त्यामुळे या दोन नेत्यांना रसद पुरविण्याचे काम राष्ट्रवादी करू शकते. तथापि, त्या बदल्यात त्यांना भोसरी व चिंचवड या मतदारसंघात भाजपची रसद हवी, असल्याचेही विश्‍वासनीय सूत्राने सांगितले.

भाजप-राष्ट्रवादी साटेलोट्याचे राजकारण करणार का?
दोन लोकसभा आणि तीनही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची संघटनात्मक बांधणीही खिळखिळी झालेली असून, त्याचाच फटका शिवसेनेला महापालिका निवडणुकीत बसला होता. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीतील नाराज दिग्गज नेते शिवसेनेच्या गळाला लागले, तरच शहरात पक्षाला अच्छे दिन येतील, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. परंतु, तशी शक्यता अत्यंत धूसर आहे. शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघात भाजपकडे ताकदीचे उमेदवार आहेत. चिंचवड मतदारसंघावर आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरी मतदारसंघावर आमदार महेश लांडगे यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेला विजय मिळेल, अशी राजकीय स्थिती नाही. तर भाजप-राष्ट्रवादीने साटेलोट्याचे राजकारण केले तर या मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होऊ शकतात. भाजपने पिंपरीतून स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्‍चित केले आहे. तथापि, भाजपमधील खा. साबळे गट मात्र या उमेदवारीला विरोध करत असल्याचे दिसत आहे. या मतदारसंघावर राष्ट्रवादीनेदेखील फारशी ताकद खर्च केलेली नाही. त्यामुळे दोन लोकसभा व एक पिंपरीच्या माफक बदल्यात भोसरी व चिंचवडच्या जागा राष्ट्रवादी पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करु शकते, असेही सूत्राने सांगितले.