भाजपाची पहिली यादी तयार

0

मुंबई । भाजपा व शिवसेना याच्यातील युतीची चर्चा थांबली आहे.तर दुसरीकडे भाजपाने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाची तयारी केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 227 जागांसाठी भाजपाच्या निवडणूक समितीने उमेदवारांची यादी पुर्ण केली आहे. भाजपा निवडणूक समितीची तीन दिवस 20 तास बैठक झाली.या बैठकीत 512 नावांची वॉर्ड नुसार चर्चा करून यादी तयार केली आहे. यावरून भाजपा स्वबळावर लढणार जवळपास निश्‍चित झाले आहे. मात्र याला मुख्यंमत्र्यांच्या आदेशाची प्रतिक्षा आहे. युतीची चर्चा थांबल्यानंतर भाजपाने आपल्या उमेदवारांची चाचपणी पुर्ण केली आहे. भाजपकडे मुंबई महापालिका निवडणूक लढवण्यासाठी एकूण 2 हजार 500 इच्छुकांचे अर्ज आले होते. त्याला पहिली चाळण लावून 1 हजार 769 इच्छुकांची यादी तयार करण्यात आली. त्यानंतर त्यातही नावांचा विचार करुन निवडणूक समितीने अखेर 512 नावांची यादी तयार केली.

युतीचा निर्णय झाल्यानंतर अंतिम यादी
भाजपच्या निवडणूक समितीने अंतिम यादी तयार करण्याचे अधिकार मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्याकडे दिले आहेत. मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली गठीत झालेल्या या निवडणुक समितीत 29 सदस्यांचा समावेश होता. या समितीने सलग तीन दिवस 20 तास मॅरेथॉन व सखोल चर्चा केली. काल रात्री 3 वाजता समितीची बैठक संपली. प्रत्येक वॉर्डासाठी 2 ते 3 नावे या प्रमाणे ही यादी तयार असून, युतीचा निर्णय झाल्यानंतर अंतिम यादी तयार करुन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे पाठवण्यात येणार आहे

काँग्रेस-राष्ट्रवादीची ठाणे महापालिकेत आघाडी
ठाणे । काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीवर ठाण्यात पालिका निवडणूकीसाठी शिक्कामोर्तब झाले आहे. 21 रोजी नारायण राणेंच्या घरी ठाण्यातील युतीवर चर्चा करण्यासाठी बैठक सुरु होती. त्या बैठकीत ठाण्यात आघाडी होण्याचे संकेत दिले आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या दोघांमध्ये ठाण्यातील आघाडीवर बराच वेळ चर्चा सुरु होती. अखेर चर्चा सकारात्मक झाली असून ठाण्यात आघाडी होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. ठाण्यासह कळवा मुंब्रा भागात राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. त्याठिकाणी काँग्रेसला जागा देण्याची तयारी राष्ट्रवादीनं दाखवली आहे. आता दोन्ही पक्षांची उमेदवारांची यादी प्रदेशाध्यक्षांकडे पाठवली जाणार आहे. काँग्रेसकडून अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे पुढील निर्णय घेणार आहेत. त्यानंतर यादी जाहीर करण्यात येणार आहे.