जळगाव। कधीकाळी भारतीय पक्ष म्हणजे तत्त्वनिष्ठ, नित्तीमत्ता विचार, प्रमाणिकता, निष्ठा असेल्या लोकांचा पक्ष समजला जायचा. पण सध्या महानगर भाजपाच्या महाभागांनी माझ्याच प्रभाग 28 मध्ये स्व. चंद्रकांत मेंडकी यांच्या स्मरणार्थ फसवे वृक्षारोपण अभियान राबविले. मी स्वत: मनसेच्या माध्यमातून गेल्यावर्षी लावलेल्या झाडांच्या ट्री गार्डवरच स्व. मेंडकीजींच्या पाट्यालावून भाजपवाले मोकळे झाले. माझ्या नावाच्या पाट्या या ट्री गार्डवर असतांना मी लावलेल्या झाडांवर भाजपा पाट्या लावल्या. इतकेच नाही तर पाच वर्षांपूर्वी आम्ही संगोपन केलेले काही वृक्ष 20 फुटांपेक्षा जास्त वाढलेत.
त्या वृक्षांनासुध्दा भाजपने वृक्षारोपणाच्या पाट्या लावून आपली बौध्दिक दिवाळखोरी दाखविली असल्याचा आरोप मनसेचे सदस्य अनंत जोशी यांनी एका पत्रकान्वये केला आहे.
स्वत:च्या नावाच्या लावताहेत पाट्या
प्रसिध्दी पत्रकातून अनंत जोशी म्हटले की, नुकताच मेंडकीकाकांचा अपमान भाजपच्या लोकांनी केला. पंडित दीनदयाल यांचे वैचारिक साहित्य रद्दी विकून टाकले, अशा उथळ आणि खोट्या लोकांचा भरणा भाजपात वाढला आहे. ज्यांना स्वत:च्या पक्ष उभारणीबद्दल आदर नाही ते शहराच्या विकासाच्या उभारणीबाबत काय बोलतील. आज सर्कीय आणि मोठे वजन असलेले दोन भाऊ पक्षात आहेत म्हणून हे नाकर्ते स्वार्थी कार्यकर्ते मजा मारताहेत पण हे दोघे जेव्हा राजकारणातून निवृत्त होतील तेव्हा त्यांच्याबद्दलही चमको कार्यकर्ते बेगडीप्रेम दाखवून त्यांनासुध्दा रद्दीत टाकतील. दोघा भाऊंनी अशा मतलबींपासून सावध रहावे, असे मत व्यक्त करुन देशात प्रधानमंत्री, राज्यात मुख्यमंत्री वृक्षलागवड अभियान प्रामाणिकपणे राबवित आहेत. मात्र जळगावातील महानगर भाजपाचे काही महाभाग आयत्या पिठावर रेघोट्या ओढत मी लावलेल्या झाडांना स्वत:च्या नावाच्या पाट्या लावत आहेत, असे जोशी यांनी पत्रकात दिला आहे.