भाजपाचे स्टार प्रचारक माजी मंत्री खडसे मात्र झुकते माप मंत्री गिरीश महाजनांना

0

भुसावळ (गणेश वाघ)- लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर राजकीय पक्षांची लगीनघाई सुरू झाली असतानाच सत्ताधारी भाजपाने स्टार प्रचारक असलेल्या माजी मंत्री एकनाथराव खडसेंऐवजी मुख्यमंत्र्यांचे संकट मोचक म्हणून ओळख असलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांवर आठ मतदारसंघांची जवाबदारी देवून खडसेंना पुन्हा एकदा आश्‍चर्याचा धक्का दिला आहे. खडसे-महाजनांमधील सख्ख्य उभ्या राज्याला ठावूक असतानाच महाजनांनी एका खाजगी चॅनललला दिलेल्या तोंडी परीक्षेत खडसेंनी पक्षासाठी अपार कष्ट घेतल्याने आपल्याला त्यांच्याप्रती सहानुभूती असल्याचे सांगून खडसेंच्या जखमांवर फुंकर घालण्याचे काम केले आहे.

खडसे अडगळीत मात्र महाजनांची चलती
गेल्या अडीच वर्षांपासून विविध आरोपांमुळे मंत्री मंडळाबाहेर असलेल्या खडसेंनी भाजपावर टिकेची झोड उठवली असल्याचे उदाहरण ताजे आहे. आतापर्यंत वक्फ बोर्डाच्या जमिनींचा विषय चर्चेत असताना खडसेंनी सावद्याच्या सभेत थेट उद्योगपती अंबानींचा बंगला जप्तीसह श्रीमंतांच्या जमिनी सरकार जमा केल्याची तयारी सुरू केल्याने पक्षातून या कारवाईस विरोध झाल्याने व मुख्यमंत्री व्हावे हे स्वप्न पाहिल्यानेच आपली ही अवस्था झाल्याचा धक्कादायक आरोप करून भाजपाच्या गोटात पुन्हा खळबळ उडवून दिली. भाजपावर सुरू असलेल्या आरोपांमुळे खडसे भाजपा सोडणार अशा वावटळ्या उठल्या असतानाच खडसे यांनी पक्षातच राहणार असल्याचे सांगून अफवांना मध्यंतरी पूर्णविरामही दिला होता. तब्बल 40 वर्षांपासून भाजपाचे कमळ फुलवण्यासाठी झिजत असलेल्या खडसेंना अलिकडे पक्षाने अडगळीत टाकून लालकृष्ण अडवाणींच्या रांगून बसवले आहे. राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचे नेते असलेल्या खडसेंऐवजी मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक असलेल्या मंत्री महाजनांवर पक्षाने अधिक जवाबदारी टाकून खडसेंना अलगद बाजूला केल्याची बाब एव्हाना खडसेंच्यादेखील लक्षात आली आहे. पार्टी विथ डिफरंट अशी बिरूदावली मिरवणार्‍या भाजपाने धुळे, नाशिक, नगरची निवडणूक असो की अण्णा हजारेंचे उपोषण वा नाशिकच्या शेतकर्‍यांचे आंदोलन असो मंत्री महाजनांवर जवाबदारी सोपवून खडसेंच्या अडचणी वाढवल्या आहेत. राज्यात चार टप्प्यात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठीदेखील मंत्री महाजनांवर जवाबदारी सोपवून खडसेंच्या अस्तित्वावर एक प्रकारे घाव घालण्याचे काम भाजपा करीत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये त्यामुळे आगामी काळातील खडसेंची भूमिका काय असेल? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ही तर संघटनात्मक पद मिळण्याची मोठी नांदी
भाजपात अन्य पक्षातील उमेदवारांचा होत असलेल्या प्रवेशामुळे खडसेंनी भाजपा हा वाल्यांचा पक्ष होवू नये, अशी अलिकडे केलेली बोजरी टिकाही पक्षश्रेष्ठींना झोंबली असताना मंत्री महाजन यांनी मात्र पक्ष संघटन वाढवण्यासाठी भाजपात इनकमिंग होणे गरजेचे असल्याचे सांगून अलिकडे आम्ही मुलेच नाही तर नातवंडेही पळवू, असे सांगून खळबळ उडवून दिली होती. महाजनांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून अलिकडच्या काळात राजकारणात ज्यांच्या घराण्याची गौरवशाली परंपरा आहे, अशा घराण्यातून अनेकांनी भाजपात प्रवेश केलेला पहायला मिळाला तर भाजपानेही सत्तेचा मुकुट मिळवल्याचे उदाहरण ताजे आहे. दिलेली प्रत्येक जवाबदारी महाजनांनी निभावून त्यात यशही मिळवल्याने लवकरच महाजनांना संघटनात्मक पद मिळण्याची दाट शक्यताही वर्तवली जात आहे.