पुणे । कर्नाटक विधानसभेत बी एस येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे काँग्रेससह जेडीएस पक्षात आनंदाचे वातावरण आहे. पण त्याही पुढे जात पुण्यात काँग्रेससह मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र सेलिब्रेशन करत एकत्र ताल धरला. पुण्यात ज्या संत बसवराज यांच्या पुतळ्याजवळ भाजपने 15 तारखेला विजयाचे ढोल वाजवले त्याच ठिकाणी सर्वपक्षीयांनी त्यांचा पराभव साजरा केला.
भाजपचे राजकारण हिटलरशाही पद्धतीने
हे सर्वपक्षीय सेलिब्रेशन करण्याचे कारण म्हणजे भाजपने हिटलरशाही पद्धतीने राजकारण खालच्या पातळीवर नेवून ठेवलेल्या राजकारणाला चपराक बसल्याने केल्याचे मनसेच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी सांगितले. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण त्यामुळे काळ सोकावत होता. भाजपने साम, दाम, दंड, भेद वापरून लोकशाहीला झुकवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना बसलेल्या दणक्याचे आम्ही एकत्रित लिब्रेशन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यात काँग्रेसच्या कमल व्यवहारे, हृषीकेश बालगुडे, राष्ट्रवादी काँग्रसचे अजय दराडे, संग्राम होनराव, शिवसेनेचे नितीन परदेशी, चंदन साळुंके, मनसेचे वसंत खुटवड, मनीषा कावेडिया आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कर्नाटकचे पडसाद पुण्यात
कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ आपल्याकडे नसल्याची जाणीव झाल्यानंतर भाजपचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी आज बहुमत चाचणीआधीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.आणि अखेर कर्नाटकातील सत्तास्थापनेच्या नाटकावर पडदा पडला. त्यामुळे तिसर्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे येडियुरप्पा अवघ्या अडीच दिवसांचे मुख्यमंत्री ठरले. या घटनेमुळे काँग्रेस आणि जेडीएस एकत्रित सत्तेचा दावा करण्यास पात्र ठरले आहेत. याचे जोरदार सेलिब्रेशन पुणे शहर काँग्रेसने केल्याचे बघायला मिळाले. पण त्यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनीही तालसे ताल मिळवत भाजपचा पराभव साजरा केला.
बहुमत चाचणीआधीच येडियुरप्पांनी राजीनामा दिल्यामुळे सरकार कोसळले. त्यामुळे पुण्यात काँग्रेस पक्षाकडून लाडू आणि पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. पुण्यात काँग्रेस भवनाच्या आवारात शहर अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना लाडू आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला.