जळगाव । सर्व सामान्य जनता ही भारतीय जनता पक्षाच्या सोबत असून जनतेच्या पाठिंब्यावरच भाजपाने देशासह राज्यात घवघवीत यश संपादन केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या यशात सर्व सामान्य जनतेचा सहभाग असून जनतेच्या पाठिंब्यामुळेच जळगाव जिल्हा हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून संबोधला जात आहे असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार गिरीष महाजन यांनी सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजित भाजपच्या विस्तृत जिल्हा बैठकीत केले. आगामी फेब्रुवारी महिन्यात होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भात नियोजन करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे जिल्ह्याभरातील कार्यकर्त्यांची विस्तृत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत घेतला तालुकानिहाय आढाव
बैठकीत तालुकानिहाय आढावा घेण्यात आला व सर्व तालुका अध्यक्षांना गटनिहाय कार्यकर्त्याचे मेळावे घेऊन पक्षांचे ध्येय धोरण ठरविण्याचे आदेश देण्यात आले. सद्य स्थितीत जळगाव जिल्हा परिषदेत भाजपचे 23 सदस्य असून आगामी काळात होत असलेल्या निवडणूकीत 40 पेक्षा अधिक सदस्य निवडूण आणण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला. दरम्यान जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे खडसे आणि महाजन असे दोन गट असल्याचे सर्वश्रृत आहे. पक्षाच्या जिल्हा बैठकीत खडसे, महाजन वादा दिसून आला. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचा सभागृहात आगमन होताच महाजन गटाच्या कार्यकर्त्यानी गिरीष महाजनांच्या नावाने व्यक्तिगत घोषणा देण्यास सुरुवात केली तद्नंतर खडसे गटांनी सुध्दा एकनाथराव खडसे यांचे नाव घेत घोषणाबाजी केली. त्यामुळे बैठकीत काही काळ तणावपूर्ण वातावरण दिसून आला होता. मंत्री महाजन यांनी कार्यकर्त्याना व्यक्तिगत घोषणा न देण्याचे आवाहन केले.
एकनाथराव खडसे आणि परिवार गैरहजर
भारतीय जनता पक्षाच्या विस्तृत जिल्हा बैठकीला एकनाथराव खडसे अनुपस्थित असल्याने सर्वाच्या भूवया उंचावल्या होत्या. मात्र जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी खडसे यांच्यावर मुंबईच्या लिलावती हॉस्पिटलमध्ये मणक्या व्याधींवर शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याने खडसे बैठकीला उपस्थित न राहू शकल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे या बैठकीला खडसे यांच्यासह परिवार अनुपस्थित होते.
शिवस्मारक रथाचे उद्घाटन
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच स्मारक उभारला जाणार आहे. या स्मारकाचे भूमिपुजन 24 डिसेंबर रोजी देशाचे पंतप्रधान यांच्या हस्ते होणार आहे. स्मारकाच्या भूमिपुजनासाठी संपुर्ण राज्यातील प्रमुख नद्यांचे पाणी आणि माती नेण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील पाणी आणि माती घेऊन जाणार्या रथाचे पुजन करण्यात येऊन उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर रथाला हिरवी झेडी दाखवत मुंबईकडे मार्गस्थ करण्यात आले.
जि.प.त 40 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा संकल्प
सद्य स्थितीत जळगाव जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाचे 23 सदस्य असून जि.प.वर युतीची सत्ता आहे. मात्र आगामी काळात भाजप स्वबळावर निवडणूक लढत असल्याने या निवडणूकीत 40 पेक्षा अधिक सदस्य जि.प.वर निवडूण गेलेच पाहिजे असा संकल्प करून मनाशी खुणगाढ बाळगा असे आदेश कार्यकर्त्यांना बैठकीत देण्यात आले.