शहरातील भाजपाच्या काही नगरसेवकांमध्ये अनेक विषयांवरून नाराजी असून ही नाराजी वेळीच दूर न झाल्यास बंडाळी उफाळण्याची दाट शक्यता आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे व आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भुसावळकरांनी भाजपाला एकहाती सत्ता दिली मात्र सत्ताधार्यांमध्येच एकमत नसल्याने त्याचा परीणाम शहराचा विकासावर जाणवू लागला आहे. त्यातच ठरावीक नगरसेवकांना ‘मानाचे पान’ दिले जात असल्याने पक्षासाठी खस्ता खाललेल्या नगरसेवकांमध्ये मात्र या प्रकाराने तीव्र संताप व नाराजीदेखील आहे. ही नाराजी वेळीच दूर न झाल्यास पक्षाला मोठी किंमत मोजावी लागेल हे सांगण्यासाठी कुणा भविष्यकाराची गरज नाही, हेही तितकेच खरे!
मर्जीतल्यांनाच मिळते ‘मानाचे पान’
भाजपातील ठरावीक गटाच्या नगरसेवकांना मानाचे पान मिळत असल्याने पक्षासाठी व पर्यायाने सत्तेसाठी खस्ता खालेल्या नगरसेवकांमधून नाराजीचा सूर आहे. उघड हे नगरसेवक विरोध करीत नसलेतरी आगामी काळात मात्र नाराजी दूर न झाल्यास निश्चित बंडाळी पेटण्याची चिन्हे असल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटते. शहर बचाव आघाडीची सत्ता असताना निष्ठावंतांना किंमत मिळत नसल्याने स्व.उल्हास पाटील यांनी बंडाचा झेंडा फडकवत पुन्हा माजी आमदार संतोष चौधरींना सत्ता मिळवून दिल्याने 2011 मध्ये रेखा चौधरी नगराध्यक्षा झाल्या होत्या. ती आठवण स्व.उल्हास पाटील यांचे बंधू नगरसेवक मुकेश पाटील यांनी प्रभागात स्वच्छता कर्मचारी ऐकत नसल्याने व स्वच्छता होत नसल्याने सोशल मिडीयातून मांडून आपला रागही व्यक्त केला तर नगरसेवक पिंटू कोठारी यांच्याबाबतही वेगळा न्याय नाही. स्वच्छता ठेकेदाराचा साधा माणूस त्यांना प्रतिसाद देत नाही त्यामुळे सत्ताधार्यांना नगरसेवक हवेत की ठेकेदार? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. तत्कालीन गटनेता प्रमोद नेमाडे यांनी पक्ष वाढीसह सर्वांना एकत्र ठेवण्याची भूमिका वठवली होती मात्र आज त्यांना कुठल्याही कार्यक्रमात वा निर्णय प्रक्रियेत स्थान नाही, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. अर्थात पक्षाच्या नगरसेवकांना घेऊन चालण्याचे काम हे भाजपाचे गटनेते मुन्ना तेली यांचे असलेतरी पक्षाच्या छोट्या-मोठ्या कार्यक्रमात त्यांची असलेली अनुपस्थिती न बोलताही बरेच काही सांगून जाते.
उपनगराध्यपदाचा मुकूट कुणाला ?
नगराध्यक्ष पदाची अभिलाषा बाळगून असलेल्या युवराज लोणारींना उपनगराध्यक्ष पद देण्यात आले असलेतरी ते वर्षभरासाठी असून लवकरच त्यांच्या जागेवर प्रा.सुनील नेवे, नगरसेवक पिंटू कोठारी, प्रमोद नेमाडे, मनोज बियाणी, रमेश नागराणी यांच्यासह आणखी काही नावांचा विचार होवू शकतो तर शहरातील विविध समाजांचा विचार करूनदेखील नगरसेवकांना संधी दिली जावू शकते. किमान तीन महिनेतरी प्रभारी नगराध्यक्षपद मिळावे, ही लोणारींची मनीषा असलीतरी पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यास त्यांना राजीनामा देणे भाग आहे.
जनआधारच्या नगरसेवकांमध्ये मरगळ
पालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या जनआधारच्या नगरसेवकांमध्ये कमालीची मरगळ आली आहे. बोटावर मोजण्याइतपत नगरसेवक सक्रिय असून अन्य नगरसेवकांना मात्र जनतेशी घेणे-देणे नाही, असा प्रकार सुरू आहे. पालिकेत कचरा टाकून जनआधारने प्रसिद्धी माध्यमांकडून पाठ थोपटून घेतली मात्र प्रत्यक्षात शहरात विविध भागातील कचरा स्वखर्चाने उचलला असता तर जनतेत आणखीन प्रतिमा उंचावली असती, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. सोशल मिडीयात अग्रभागी असलेल्या जनआधारच्या नगरसेवकांनी प्रत्यक्षात जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची खरी गरज आहे. अर्थात त्यांचा रीमोटही माजी आमदार संतोष चौधरींच्या हातात असल्याने ‘ते सांगतील ती पूर्व दिशा’, असाच काहीसा हा प्रकार आहे. चौधरी सध्या शांत असलेतरी आगामी काही दिवसात ते पालिकेतील अनेक विषयांना घेऊन गौप्यस्फोट करण्याची दाट शक्यता आहे.
‘अमृता’च्या गोडव्याने समाधान
केंद्र शासनाच्या अमृत योजनेचे काम मार्गी लागले असून या वा पुढील महिन्यात या योजनेच्या कामाचा शुभारंभ होण्याची दाट शक्यता आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे व नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी योजनेच्या मंजुरीसाठी केलेले प्रयत्न व धावपळ कौतुकास्पद आहे. आगामी 50 वर्षांचा पाणीप्रश्न या योजनेतून सुटणार असल्याने ही योजना शहरवासीयांसाठी ‘अमृत’ ठरणार आहे.
गुन्हेगारी ठेचण्याची गरज
शहरात गुन्हेगारी वाढली आहे. खून, चोर्या-घरफोड्या हे प्रकार शहर व तालुकावासीयांना नित्याचे झाले आहेत. पिंप्रीसेकम सरपंचांच्या खुनाचा अद्याप उलगडा नाही, अनेक चोर्या-घरफोड्यांचा तपास कागदावर सुरू आहे तर तपास यंत्रणा हातावर हात ठेवून असल्याने गुन्हेगारांचे फावले आहे. भुसावळातील गुन्हेगारी ठेचण्यासाठी आता कठोर पावले नव्हे तर प्रत्यक्षात कृती करण्याची गरज आहे. पोलिसांवरील विश्वास व गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी आवश्यक आहे.
अतिक्रमितांना आधी हवी पर्यायी जागा
रेल्वेच्या जागेवर तब्बल तीन पिढ्या ज्यांच्या गेल्या, मुला-मुलींची लग्ने होवून अनेकांनी या जागेवर आयुष्याच्या अखेरचा श्वासही घेतला त्या जागेवरील झोपड्या रेल्वेने हटवण्यासाठी कंबर कसली आहे. रेल्वेच्या जागेवरील हे अतिक्रमण असलेतरी आधी गरीबांना हक्काची जागा देणे शासनाची व रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे. विकासासाठी अतिक्रमण हटणे गरजेचे असलेतरी लोकप्रतिनिधींनी हा तिढा सोडवावा, अशी अपेक्षा आहे. तसे झाल्यास कायदा-सुव्यवस्था अबाधीत राहून शहराचा नावलौकीक निश्चित उंचावेल, यात शंकाच नाही.
रस्त्यांची किमान डागडूजीची अपेक्षा
अमृत योजनेमुळे शहरातील अंतर्गत व प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण रखडले आहे. सर्वाधिक त्रास मामाजी टॉकीज रोडसह वरणगाव रोडवरून प्रवास करणार्या नागरीकांसह वाहनधारकांना होत आहे. किमान या रस्त्यांची डागडूजी पालिकेला शक्य आहे मात्र ही कामेदेखील होत नसल्याने शहरातून तीव्र नाराजीचा सूर आहे.
– गणेश वाघ, भुसावळ
9021310269