बारामती (वसंत घुले)। बारामतीतील भाजपामध्ये दुफळी वाढतच असून सामान्य कार्यकर्ता यामुळे अस्वस्थ बनला आहे. बारामती तालुक्यात भाजप विस्तारताना दिसत नाही, खेडोपाडी, वाड्यावस्त्यांमध्ये शाखा उघडतानाही दिसत नाही, मंत्री महोदयांचे दौरे होत नाहीत, नवीन कामांचे आराखाडे बनत नाहीत, असे एक ना अनेक प्रश्न भाजपा कार्यकर्त्यांसमोर आहेत. मात्र वरिष्ठ व स्थानिक नेतृत्त्व सांभाळत असलेल्यांकडून सामान्य कार्यकर्त्यांची उपेक्षाच होताना दिसत आहे.
पदाधिकार्यांचे मिळेना सहकार्य
भाजपचे सरकार तीन वर्षे झाली तरी बारामतीत भाजप वाढताना दिसत नाही. हा एक चर्चेचा विषय बनला आहे. निष्ठावान कार्यकर्ते पक्ष वाढावा म्हणून प्रयत्न करीत असताना तालुक्यातील काही वरिष्ठ पदाधिकारी मात्र सहाकार्य करीत नाहीत, अशी रास्त तक्रार करताना दिसत आहेत. वास्तविक पाहता बारामती तालुक्यात असंख्य प्रश्न सर्वसामान्य नागरिकांसमोर आहेत. मात्र, त्यासाठी पदाधिकारी वेळ देण्यास तयार नाहीत. बहुसंख्य पदाधिकारी अथर्र्पूर्ण कामासाठी आठवड्यातील दोन किंवा तीन दिवस मुंबईत असतात. तर काही दिवस हे पुण्यात असतात. त्यामुळे तालुक्यातील भाजपा विस्कळीत आहे, असेही कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली
येत्या दोन वर्षात लोकसभा विधानसभा निवडणुका येतील त्यावेळी लोकांसमोर कोणत्या तोंडाने जायचे हाही प्रश्न भेडसावतो. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात भाजपाचे फार मोठे काम उभे राहावे. खेड्यापाड्यातील वाडीवस्तींवर रचनात्मक कामाच्या आधारावर पक्ष उभा रहावा त्यासाठी कार्यकर्त्यांनी व विशेषत: पदाधिकार्यांनी कामे करावीत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मात्र काही पदाधिकारी या आवाहनाला पद्धतशीरपणे काळीमा फासताना दिसत आहेत.
जोशी यांचा दौरा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक भय्याजी जोशी 27 सप्टेंबरला बारामतीत येत आहेत. त्यांचा संपूर्ण दिवसभराचा कार्यक्रम शहरात आहे. यावेळी काही महत्त्वाचे पदाधिकारी व व्यक्ति यांच्याशी ते संवाद साधणार आहेत. याचवेळी काही महत्त्वाचे राजकीय पदाधिकारी त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे बारामतीच्या राजकीय परिस्थितीत चांगलाच बदल होण्याची शक्यता आहे. हा दौरा फार महत्त्वाचा मानला जातो.