पिंपरी-चिंचवड (विशेष प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक ममता गायकवाड यांनी स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत अर्ज दाखल केल्यानंतर महापालिकेत राजकीय भूकंप आला. सत्ताधारी भाजप उभा फुटला असून, गायकवाड यांची सभापतिपदी वर्णी लागणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांचे समर्थक तथा महापौर नितीन काळजे यांनी आपल्या महापौरपदाचा राजीनामा शहराध्यक्ष आ. जगताप यांच्याकडे सुपूर्त केला. तर स्थायीचे सदस्य राहुल जाधव, शीतल शिंदे यांनी आपल्या समिती सदस्यत्वाचा राजीनामा पक्षनेते एकनाथ पवार यांच्याकडे सुपूर्त केला. सभापतिपदासाठी आ. लांडगे गटाकडून राहुल जाधव यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. जाधव यांना डावलून पहिल्यांदाच नगरसेवक झालेल्या ममता गायकवाड यांना संधी मिळाल्याने हे सर्व राजीनामानाट्य घडले. दरम्यान, भाजपात उभी फूट पडल्याचे पाहून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अचूक टायमिंग साधत मोरेश्वर भोंडवे यांनी सभापतिपदासाठी अर्ज सादर केला. त्यामुळे सत्ताधारी भाजपवर निवडणुकीला सामोरे जाण्याची नामुष्की ओढावली. भोंडवे यांच्या पाठिशी आ. लांडगे गट उभा राहणार असल्याचे संकेत मिळत असून, शिवसेनेनेदेखील भोंडवे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. स्थायीत शिवसेनेचा एक नगरसेवक आहे. एकत्र पत्रकार परिषद घेऊन शिवसेना-राष्ट्रवादीने तशी भूमिकाही जाहीर केली. त्यामुळे आ. जगताप गटाला जोरदार धक्का मानला जात आहे.
मोरेश्वर भोंडवेंसाठी राष्ट्रवादी-शिवसेना युती!
महापालिकेची तिजोरी मानली जात असलेल्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी भाजपकडून विलास मडिगेरी, राहुल जाधव, शीतल शिंदे यांच्या नावाची चर्चा होती. परंतु, काल रात्री अचानक घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले विनायक गायकवाड यांच्या पत्नी प्रथमच नगरसेविकापदी निवडून आलेल्या ममता गायकवाड यांचे नाव अनपेक्षितपणे पुढे आले. गायकवाड हे शहराध्यक्ष आ. जगताप यांचे कट्टर समर्थक आहेत. तर या पदासाठी गायकवाड यांचा एकमेव अर्ज भरण्यात आला. त्यामुळे भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांचा गट प्रचंड अस्वस्थ झाला. अर्ज भरण्याच्या काहीक्षण अगोदर आ. लांडगे यांचे बंधू कार्तिक लांडगे हे महापौर नितीन काळजे, स्थायी समितीचे प्रबळ दावेदार राहुल जाधव यांच्यासह पालिकेत दाखल झाले. सभागृह नेत्याच्या कार्यालयात महापौर काळजे यांनी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्याकडे महापौरपदाचा राजीनामा दिला, त्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यातच स्थायीचे सदस्य राहुल जाधव, शीतल शिंदे यांनीदेखील सदस्यत्वाचा राजीनामा देऊन आ. जगताप यांना धक्का दिला. त्यामुळे अधिकृत उमेदवार ममता गायकवाड यांच्याविरोधात आ. लांडगे गट बंडखोरी करणार असल्याचे उघड झाले आहे. भाजपमधील या फुटीचा अचूक लाभ घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मोरेश्वर भोंडवे यांना सभापतिपदासाठी अर्ज भरण्यास सांगितले. भोंडवे हे आ. जगताप यांचे कट्टर विरोधक आहेत. भोंडवे यांना पाठिंबा देण्याची खेळी शिवसेनेने खेळली. तर आ. जगताप समर्थकदेखील भोंडवे यांना ताकद पुरविणार असल्याचे वरिष्ठ पातळीवरून सांगण्यात आले.
भाजपने व्हिप बजावून भरला अर्ज
स्थायी समितीत राष्ट्रवादीचे चार सदस्य असून, एक सदस्य शिवसेनेचा आहे. तर आ. लांडगे यांचे तीन समर्थक आहे. बुधवारी या पदासाठी अंतर्गत निवडणूक झाल्यास भोंडवे यांना 8 तर ममता गायकवाड यांना भाजपचे तीन व एक अपक्ष असे चार मते मिळू शकतात, अशी माहिती वरिष्ठस्तरीय राजकीय सूत्राने दिली आहे. स्थायीचे अध्यक्षपद आपल्याकडेच रहावे यासाठी आ. जगताप, आ. लांडगे आणि भाजपचे निष्ठावंत अशा तीन गटांमध्ये शर्तीचे प्रयत्न सुरु होते. अखेर जगतापसमर्थक ममता गायकवाड यांचा एकमेव अर्ज दाखल करण्याचा पक्षादेश काढण्यात आला होता. त्यामुळे आ. लांडगेसमर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. महापौरांनी तडकाफडकी राजीनामा देऊन पक्षाच्या या निर्णयाचा निषेध नोंदविला. या घडामोडी घडत असतानाच, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांचाही पक्षश्रेष्ठींनी राजीनामा घेतल्याची माहिती महापालिका वर्तुळात पसरली होती. तसेच, आ. भोंडवे यांच्या समर्थनार्थ शिवसेनेला सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे, प्रज्ञा खानोलकर, गीता मंचरकर तसेच कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांची उपस्थिती होती. विशेष बाब म्हणजे सभापतिपदासाठी डावलले गेलेले शीतल शिंदे यांनीदेखील या पत्रकार परिषदेला हजेरी लावली. आ. जगताप यांचे समर्थक नवनाथ जगताप हेदेखील हजर होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
स्थायी समितीचे अध्यक्षपद राहुल जाधव यांना मिळणे अपेक्षित होते. परंतु, त्यांना ते पद मिळाले नाही. जाधव यांना पद मिळण्यासाठी माझ्या पदाचा भौगोलिक अडसर ठरत होता. त्यामुळे मी महापौरपदाचा राजीनामा पक्षाच्या शहराध्यक्षांकडे दिला आहे. भाजपने मला महापौरपदाचा मान दिला, त्याबद्दल मी पक्षाचा ऋणी आहे.
– नितीन काळजे, महापौर