माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांची भुसावळात कोपरखळी ; सत्तेत राहून पक्षावर टिका करणार्या शिवसेनेची भूमिका चुकीचीच
भुसावळ- काँग्रेस राजवटीत भ्रष्टाचार बोकाळला, देश विकासात मागे पडला, हिंदू-मुस्लीम दंगलीमुळे समाजात वितुष्ट आले मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत केंद्रासह राज्यात भाजपाचे सरकार आले. गेल्या साडेचार वर्षात पक्षाने अनेक विकासकामे केली असून ती जनतेपर्यंत पोहोचण्याची जवाबदारी आपल्यावर आहे. भाजपात अनेक लोक आले अन् मंत्रीही झाले याबाबत मला बोलायचे नाही कारण तुम्ही सुज्ञ आहात, अशी कोपरखळी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे मारली. शहरातील लोणारी समाज मंगल कार्यालयात भाजपा बुथप्रमुख व शक्ती केंद्रप्रमुखांची शुक्रवारी सकाळी कार्यशाळा झाली. याप्रसंगी ते बोलत होते. भाजपाची कामे जनतेपर्यंत पोहोचवा, आगामी निवडणुकीत विजय भाजपाचाच आहे, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. भाषणानंतर खडसेंनी कार्यकर्त्यांना जे विचारायचे आहे ते विचारा मात्र नाथाभाऊ मंत्री का झाले नाही? हे विचारू नका, अशी मार्मिक टिपणी केल्याने हास्याचे फवारेही उडाले. युती सरकारमध्ये असलेल्या शिवसेनेच्या भूमिकेवर खडसेंनी टिका करीत त्यांनी जनतेपुढे बोलण्याऐवजी मंत्री मंडळाच्या कॅबिनेट बैठकीत बोलावे, असा ज्येष्ठत्वाचा सल्लाही दिला. व्यासपीठावर आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.