भाजपात पुन्हा अंतर्गत गटबाजी

0

जळगाव। जिल्ह्यातील भाजपात जलसंपदामंत्री गिरीश महाजन व माजी महसुलमंत्री एकनाथराव खडसे या दोन मातब्बर नेत्यांमध्ये पक्षांतर्गत मतभेद असल्याचे जाहीर आहे. त्यांच्यातील मतभेदामुळे भाजपात अंतर्गत कलहाचे वातावरण नेहमीच असते. मागील दोन तीन वर्षापासून पक्षातील अंतर्गत वाद अनेकदा चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले आहे. दोन महिन्यापूर्वी जिल्हा परिषद निवडणुक पार पडली. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतीपद निवडी प्रसंगी दोन्ही गटात रस्सीखेच दिसून आली होती. अशीच रस्सीखेच भाजपात जिल्हा परिषदेच्या विषय समिती सदस्य निवडतांना पुन्हा दिसून आली. सभापती निवड होऊन महिन्याभराचा कालावधी उलटल्यानंतर जिल्हा परिषदेच्या समिती वाटपावेळी खडसे समर्थक असलेले उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्याकडील बांधकाम आणि अर्थ समिती काढून घेण्यात असून महाजन समर्थक असलेल्या महिला बालकल्याण समिती सभापती रजनी चव्हाण यांच्याकडे बांधकाम तर पोपट भोळे यांच्याकडे अर्थ समितीचे सभापतीपद देण्यात आले आहे. यावरु भाजपातील अंतर्गत गटबाजी पुन्हा दिसून येते. गेल्या दहा वर्षापासून जिल्हा परिषदेच्या बांधकाम व अर्थ समितीचे सभापती पद हे उपाध्यक्षाकडे देण्याची परंपरा होती. यावेळी मात्र ही परंपरा मोडीत काढण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांनी महिनाभरानंतर बुधवारी 3 रोजी उशीरा समित्यांची यादी प्रसिद्ध केली.

मदतीचे हात देण्यार्‍यांना डावलले
जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेसाठी भाजपाला एका जागेची आवश्यकता होती. अखेर शिवसेनेला दुर ठेवत, कॉग्रेसच्या चार सदस्यांनी प्रत्यक्ष तर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या तीन सदस्यांनी गैरहजर राहून अप्रत्यक्षरीत्या दिलेल्या पाठिंबाच्या जोरावर भाजपाने जिल्हा परिषदेवर पहिल्यांदा एकहाती सत्ता स्थापन केली. सत्ता स्थानेसाठी मदत केल्याने कॉग्रेसला एक सभापतीपद देण्यात आले. महत्वपूर्ण असणारी स्थायी समितीत इतरांना सामावून घेतले जाईल असे बोलले जात होते. मात्र प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणार्‍या सदस्यांना स्थायीतुन डावलण्यात आले आहे.

स्थायी समिती
जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांवर सदस्य निवडीच्या तिढ्यातून मार्ग काढत समिती सदस्यांची यादी निश्चित करण्यात आली. जिल्हा परिषदेचे सर्व विषय हे स्थायी समितीतुन जात असल्याने ही समिती महत्वपूर्ण मानली जाते. त्यामुळे सर्वांचे लक्ष या समितीकडे लागून होते. या समितीवर भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी तीन तर राष्ट्रवादीचे दोन सदस्य घेण्यात आले आहेत. भाजपचे कैलास सरोदे, मधुकर काटे- पाटील, ज्योती राकेश पाटील, शिवसेनेेचे गटनेते मनोहर पाटील, प्रताप गुलाबराव पाटील नानाभाऊ महाजन, राष्ट्रवादीचे गटनेते शशिकांत साळुंखे आणि सरोजिनी गरुड यांची नियुक्ती केली आहे. कॉग्रेसने सत्ता स्थापनेसाठी सहकार्य केले असतांना देखील स्थायीतुन डच्चु देण्यात आले आहे.

अशी आहेत सभापतीपदे
उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांना कृषी व पशुसंवर्धन, दुग्धशाळा समिती, पोपट भोळे यांना शिक्षण, क्रीडा व अर्थ समिती, कॉग्रेसचे दिलीप पाटील यांना आरोग्य समिती, रजनी चव्हाण यांना बांधकाम समिती सभापतीपद देण्यात आले आहे. अर्थ समितीचे पद उपाध्यक्षांकडे होते ते काढण्यात आले आहे. विविध दहा समितीत अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सभापती वगळता 76 सदस्यांना विविध समितीत सामावून घेण्यात आले आहे.